ठाण्यात वाहने जळीतकांड सुरुच: रिक्षासह दहा वाहनांना आगी लावणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:00 PM2019-01-14T22:00:22+5:302019-01-14T22:13:11+5:30
आपल्या वडीलांच्या नावावर असलेली दुचाकी चुलत्याने चालविण्यासाठी न दिल्याच्या रागातून अजय भुंबक याने त्याच्या दुचाकीला आग लावल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. याप्रकरणी श्रीनगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
ठाणे: ठाण्यात वाहने जाळण्याचे प्रकार सुरुच असून सोमवारी पहाटेही वागळे इस्टेट परिसरात क्षुल्लक कारणावरुन दुचाकी पेटविणाऱ्या अजय भुंबक (२३) याला सोमवारी सकाळी श्रीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याची ठाणे न्यायालयाने जामीनावर सुटका केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून ठाण्यात वाहने जाळपोळीच्या चार घटना घडल्या. या सर्व घटनांमध्ये पूर्ववैमनस्यातून या गाडया जाळण्यात आल्याचे आढळले आहे. वागळे इस्टेट बस डेपोजवळील भागात पाच रिक्षा आणि पाच मोटारसायकली जाळण्याचा प्रकार सोमवारी पहाटे ३ वा. च्या सुमारास घडला. ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली. परंतू, या वाहनांचे यात मोठया प्रमाणात नुकसान झाले. श्रीनगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांच्या पथकाने ज्यांची वाहने जळाली त्यांचे कोणाशी वाद झाले? याचा शोध घेतला. तेंव्हा अजयला त्याच्या चुलत्यांनी रविवारी त्यांची मोटारसायकल चालविण्यासाठी दिली नसल्याची माहिती समोर आली. अजयच्या वडीलांच्या मालकीची आणि नावावर असलेली मोटारसायकल त्याच्या चुलत्यांकडे होती. या मोटारसायकलीच्या कर्जाचे हाप्तेही तेच बँकेत भरणा करीत होते. याच कारणास्तव त्यांनी त्याला रविवारी दुचाकी दिली नाही. याच गोष्टीचा राग आल्याने त्याने आधी त्यांची ही मोटारसायकल जाळली. त्याची धग लागून इतर चार मोटारसायकली आणि पाच रिक्षाही मोठया प्रमाणात जळाल्या. पोलिसांच्या चौकशीतही त्याने कबूली दिल्यानंतर सोमवारी सकाळी ९.३० वा. त्याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली.
................................
यापूर्वीही नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील चार, ठाणेनगर एक, वागळे इस्टेट दोन आणि कासारवडवली पोलीस ठाण्याच्या परिसरात दोन वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. या सर्व प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.