वरसावे पुलाला पुन्हा तडे; पुढील आठवडयात दुरुस्तीला सुरुवात

By admin | Published: September 29, 2016 10:53 PM2016-09-29T22:53:36+5:302016-09-29T22:53:36+5:30

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे

Versa bridge pulls again; The start of the repair next week | वरसावे पुलाला पुन्हा तडे; पुढील आठवडयात दुरुस्तीला सुरुवात

वरसावे पुलाला पुन्हा तडे; पुढील आठवडयात दुरुस्तीला सुरुवात

Next

राजू काळे
भाईंदर - मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 8 वरील वरसावे पुलाच्या गर्डरला पुन्हा तडे गेल्याचे नुकत्याच पूर्ण झालेल्या स्ट्रक्टरल ऑडीटमुळे निदर्शनास आले आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी हा पुल पुढील आठवडयात वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.
सध्या या पुलावरून पुढील धोका टाळण्यासाठी केवळ हलक्या वाहनांना प्रवेश देण्यात येत आहे. तर बाजूच्या पुलावरून अवजड वाहने प्रत्येकी 15 ते 20 मिनिटांच्या अंतराने सोडली जात आहेत. यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूस मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत असून तिच्या नियोजनासाठी पालघर व ठाणे ग्रामीण वाहतूक व स्थानिक पोलीस कर्मचारी, अधिकारी 24 तास तैनात करण्यात आले आहेत. गेल्या 33 वर्षांत पुलाची तिसऱ्यांदा दुरुस्ती करण्यात येत आहे. 2013 मध्ये देखील पुलाच्या गर्डरला तडा गेल्याने तब्बल दिड वर्षे पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता.

त्यामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन वाहनांना त्यातून बाहेर पाडण्यासाठी तब्बल 2 ते 3 तासांचा विलंब लागत होता. यानंतर पुलाच्या दुरुस्तीचा मुद्दा ऑगस्टमध्ये महाड येथील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेमुळे उपस्थितीत झाला. त्याचे वृत्त प्रथम लोकमतने प्रसिद्ध केल्यानंतर 3 सेप्टेंबरला भारतीय राष्ट्रीय महामार्गीय प्राधिकरणाने (एनएचएआय) आंतरराष्ट्रीय दर्जाचे बांधकाम तज्ञ डॉ. रैना यांच्या नेतृत्वाखालील पथकामार्फत पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात केली. ती 22 सप्टेंबरला पूर्ण करण्यात आली.

तपासणी दरम्यान पुलाच्या वरसावे बाजूकडील चौथ्या क्रमांकाच्या 114 मीटर लांबीच्या गर्डरला एकूण तीन तडे गेल्याचे आढळून आले. यात एक तडा मोठा असून उर्वरित लहान स्वरूपाचे तडे आहेत. सध्या त्याची दुरुस्ती कशा प्रकारे करायची त्याची आखणी पथकाद्वारे केली जात आहे. त्यांच्याकडून पद्धतशीर दुरुस्तीचे निर्देश आल्यानंतर दुरुस्तीला सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचा अंतिम अहवाल या आठवड्यात एनएचएआयला प्राप्त होणार असून पुढील आठवड्यात त्याच्या दुरुस्तीला प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे. त्यावेळी मात्र पुलावर सध्या सुरु असलेली हलक्या वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या दुरुस्तीला किमान 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची शक्यता एनएचएआयकडून वर्तविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी मोठा विलंब लागण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

पुलाच्या दुरुस्तीदरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील दापचारी, नाशिकरोड, वाडा-भिवंडी रोड आदी ठिकाणी अवजड वाहने टप्या-टप्याने गुजरात व मुंबईच्या दिशेने सोडण्यासाठी वाहनतळ निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे वाहतूक कोंडीचे काही प्रमाणात नियोजन होऊन त्याचा ताण सुसह्य होणार आहे. यावर पालकमंत्र्यांकडून थेट नियंत्रण ठेवले जात असून दुरुस्ती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे एनएचएआयकडून सांगण्यात आले आहे.

Web Title: Versa bridge pulls again; The start of the repair next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.