वरसावे पूल पुन्हा अवजड वाहनांसाठी राहणार बंद; १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान दुरुस्तीचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2021 10:41 AM2021-11-12T10:41:41+5:302021-11-12T10:45:02+5:30
याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती.
पारोळ/मीरा रोड : भाईंदर खाडीवरील वरसावे पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून हाती घेण्यात आले आहे. या काळात १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान खाडीपूल अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंद असणार आहे. या काळात हलक्या वाहनांना पुलावरून एन्ट्री असली तरी या वाहनांसाठी केवळ एकच मार्गिका खुली असणार आहे. पुलाचे काम सलग तीन दिवस चालणार असल्याने येणाऱ्या तीन दिवसांत मुंबईहून गुजरातकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.
भाईंदर खाडीपूल हा तसा जुना झाला आहे. मध्यंतरी या पुलाच्या एका बाजूच्या गर्डरला तडे गेल्याने मोठ्या कालावधीसाठी पूल दुरुस्ती कामासाठी बंद ठेवण्यात आला होता, मात्र त्यानंतरही अधूनमधून या पुलाचे काम निघतच आहे. पुलाच्या दुरुस्तीचे काम महामार्ग प्राधिकरणाकडून याआधी हाती घेण्यात आले होते, मात्र ठाण्यातील वाहतूककोंडीचा जटिल तिढा समोर आल्याने पुलाचे काम करण्यासाठी काढण्यात आलेली अधिसूचना महामार्ग प्राधिकरणला दोन वेळा रद्द करावी लागली आहे.
याआधी २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान पुलाच्या दुरुस्ती कामासाठी पहिली अधिसूचना काढून अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. मात्र वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवल्याने ही अधिसूचना रद्द करावी लागली होती. त्यानंतर ३० ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान पुन्हा पूल बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र पुन्हा ही अधिसूचना रद्द करावी लागली. आता १३ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ही अधिसूचना काढून पुलाचे काम अखेर हाती घेण्यात आले आहे. तीन दिवसांच्या काळात पुलाचे काम हाती घेण्यात आले असल्याने अवजड वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस पर्यायी मार्गावर वाहतूककोंडीचा प्रश्न उद्भवणार आहे.