ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस ‘कोमसाप’च्या जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 17, 2023 07:32 PM2023-07-17T19:32:19+5:302023-07-17T19:32:57+5:30

ठाण्यात रंगणार ‘कोमसाप’चे जिल्हा साहित्य संमेलन

Veteran novelist Rajan Gavas President of District Literary Association of 'Komsap' | ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस ‘कोमसाप’च्या जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस ‘कोमसाप’च्या जिल्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष

googlenewsNext

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा साहित्य संमेलन यंदा रविवार ३० जुलै रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ७ या वेळेत ठाणे येथील आनंद विश्व गुरूकुल विधी महाविद्यालयात रंगणार आहे. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कादंबरीकार राजन गवस हे या संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवणार असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी असणार आहेत. ज्येष्ठ साहित्यिक व कोमसापचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांची या संमेलनाला प्रमुख उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

कोकण मराठी साहित्य परिषद, आनंद विश्व गुरूकुल, शारदा एज्युकेशन ट्रस्ट, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन, अभिवाचन आदी सत्रांतून ठाणेकरांना साहित्यिक मेजवानी मिळणार आहे. यात ‘समाजमाध्यमांवर प्रसारित होणारे साहित्य आणि त्याची प्रगल्भता’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादात दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक अतुल कुलकर्णी व अन्य ज्येष्ठ पत्रकार आपले विचार मांडणार आहेत तर प्रा. दीपा ठाणेकर या परिसंवादाचे सूत्रसंचालन करणार आहेत. याशिवाय प्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन, कथाकार किरण येले यांच्या अध्यक्षतेखाली अभिवाचन सत्र, तसेच ठाणे महापालिकेचे उपायुक्त व गझलकार संदीप माळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कवी कॅप्टन वैभव दळवी यांच्या अध्यक्षतेखाली खुल्या कवी कट्ट्याचेही संमेलनात आयोजन करण्यात आले आहे. या कवीसंमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, या संमेलनात ‘बहर’ ही स्मरणिका प्रकाशित होणार आहे. कोमसापच्या अध्यक्ष नमिता कीर आणि कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांच्या मार्गदर्शनाखाली या संमेलनाचे नियोजन केले आहे. पत्रकार परिषदेला शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, कोमसापचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, स्वागताध्यक्ष सुनील चौधरी व इतर उपस्थित होते. 

Web Title: Veteran novelist Rajan Gavas President of District Literary Association of 'Komsap'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे