लसीच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:42 AM2021-05-07T04:42:17+5:302021-05-07T04:42:17+5:30

ठाणे : लसींच्या तुटवड्याचा सामना महापालिकेबरोबरच जिल्हा प्रशासनाला देखील करावा लागत आहे. त्याचा फटका लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना ...

Veterans for a second dose of vaccine | लसीच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण

लसीच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची वणवण

googlenewsNext

ठाणे : लसींच्या तुटवड्याचा सामना महापालिकेबरोबरच जिल्हा प्रशासनाला देखील करावा लागत आहे. त्याचा फटका लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. गुरुवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. इतर कुठेही लस मिळत नसल्याने ज्येष्ठांनी आपला मोर्चा जिल्हा रुग्णालयाकडे वळविला होता. परंतु, त्याठिकाणी १८ ते ४४ वयोगटासाठीच लसीकरण केले जात असल्याने तासन तास रांगेत उभे असलेल्या ज्येष्ठांना अखेर घरची वाट धरावी लागली. यामुळे जवळजवळ दोन तासाहून अधिक काळ रुग्णालयाच्या आवारात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने कोव्हॅक्सिनच्या लसीकरणास सुरुवात झाली. विशेष म्हणजे एक दिवस आधीच रुग्णालय प्रशासनाने सोशल मीडियावर मेसेजद्वारे गुरुवारी केवळ १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचेच लसीकरण केले जाणार असल्याने दुसरा डोस घेण्यासाठी कोणीही येऊ नये, असे आवाहन करूनही गुरुवारी पहाटेपासूनच जिल्हा शासकीय रुग्णालयाबाहेर ज्येष्ठांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून आज तुमचे लसीकरण करण्यात येणार नसल्याचे सांगितले जात असतानाही लस हवीच म्हणून ज्येष्ठांनी गोंधळ घातला. त्यांचा हा राग तसा रास्तच होता. काहींना पहिला डोस घेतल्यानंतरचा दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला होता. तर पुढे आपल्याला लस मिळेल की नाही, यासाठी येथे त्यांनी गर्दी केली होती. काही वेळ रुग्णालय प्रशासन आणि नागरिकांमध्ये येथे वादही झाला. एका महिलेला तर दोन महिने होऊन गेले असतानाही अद्यापही लस मिळू शकलेली नाही. त्यातही केवळ ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक येथे रांगेत उभे नव्हते. तर मुलुंड, भांडुप तसेच जिल्ह्याच्या इतर ठिकाणाचेही ज्येष्ठ नागरिक येथे कोव्हॅक्सिनची लस घेण्यासाठी आले होते.

ठाणे महापालिकेच्या सेंटरमध्ये केवळ कोव्हीशिल्डचीच लस

एकीकडे जिल्हा रुग्णालयात गुरुवारी कोव्हॅक्सिनची लस दिली जात असल्याने नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.तर दुसरीकडे ठाणे महापालिकेच्या १९ केंद्रावर कोव्हीशिल्डचीच लस दिली गेली. त्याठिकाणी दुसरा डोस दिला जात होता. परंतु, कोव्हॅक्सिनचा साठा महापालिकेकडे नसल्याने त्याठिकाणी न जाता ज्येष्ठ नागरिकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे धाव घेतली.

ठाणे महापालिकेच्या केंद्रावरही गोंधळ

ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ग्लोबल रुग्णालयात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात होते. तर इतर १८ ठिकाणी कोव्हीशिल्डचा दुसरा डोस दिला जात होता. त्यामुळे लस मिळविण्यासाठी नागरिकांनी महापालिकेच्या केंद्रावर देखील गर्दी केली होती. परंतु, ही प्रत्येक केंद्र केवळ दोन तासच सुरू ठेवण्यात आल्याने प्रत्येक केंद्राबाहेर लांबच लांब रांगा होत्या.

लस आल्यावर कॉल करून ज्येष्ठांना बोलावणार

पहाटेपासून उभे असलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अखेर मनधरणी केली. स्थानिक नगरसेवक सुधीर कोकाटे आणि जिल्हा शल्यचिकित्सक कैलास पवार यांनी आमच्याकडे लसच येत नसल्याने आम्ही तरी काय करणार असे सांगितले. लसींचा अपुरा साठा असल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु, यापुढे लस जशा उपलब्ध होतील तसे तुम्हाला फोन करून बोलवले जाईल, असे आश्वासन दिले. यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला आपला मोबाइल नंबर देण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार त्यांनी आपला मोबाइल क्रमांक रजिस्टरमध्ये लिहिला. लस न घेता परत जाण्याची वेळ त्यांच्यावर आली.

.....

मी चार दिवस सतत येथे सकाळी सहा वाजल्यापासून रांगेत उभा राहत आहे. परंतु, अद्यापही लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही.

(संतोष नायर - ज्येष्ठ नागरिक)

मला पहिला डोस घेऊन जवळजवळ दोन महिने झाले आहेत. परंतु, अद्यापही दुसरा डोस मिळालेला नाही. रोज मी लस मिळेल या आशेने येत आहे. परंतु, पुन्हा परत घरी जावे लागत आहे.

(अनुसया कांबळे - ज्येष्ठ नागरिक , महिला)

.......

" पहिल्यांदा असे झाले की लस उपलब्ध नसल्याने नागरिकांना पुन्हा घरी पाठवण्याची वेळ आली आहे. लसीचा साठा उपलब्ध असताना त्याचा डोस येणाऱ्या नागरिकांना दिला गेला आहे. गुरुवारी पहाटेपासून नागरिकांची प्रचंड झालेली गर्दी आणि ते सांगून ऐकत नसल्याने अखेर पोलिसांना बोलवावे लागले. गुरुवारी फक्त १८ ते ४४ या वयोगटातील ऑनलाईन नोंदणी केलेल्यांना कोव्हॅक्सिनचा डोस देण्यात आला."

डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, ठाणे

Web Title: Veterans for a second dose of vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.