ठाण्यात परांजपे विरुद्ध विचारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 01:07 AM2019-03-15T01:07:03+5:302019-03-15T01:07:30+5:30

राष्ट्रवादी काँग्रेससाठी तारेवरची कसरत

Vichare against Thane Paranjape | ठाण्यात परांजपे विरुद्ध विचारे

ठाण्यात परांजपे विरुद्ध विचारे

Next

ठाणे : लोकशाही आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली असून ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांचे नाव घोषित झाले आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या निवडणुकीत रंगणार आहे. यावेळी लोकशाही आघाडीचाच उमेदवार बाजी मारेल, असा दावा राष्ट्रवादीने केला असून मागील निवडणुकीच्या तुलनेत दुपटीने मते मिळतील, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात कोणाला किती मते द्यायची, हे मतदारराजाच निश्चित करणार आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघ हा पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून हा बालेकिल्ला हिरावून घेण्यात राष्टÑवादीला यश आले होते; परंतु हे यश त्यांना जास्त काळ टिकवता आले नाही. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीचे संजीव नाईक विरुद्ध शिवसेनेचे राजन विचारे यांच्यात सामना रंगला होता. त्यावेळी मोदीलाटेत विचारे यांनी शिवसेनेचा गड पुन्हा आपल्याकडे खेचून घेतला. २०१९ मध्ये राष्टÑवादीकडून नाईक कुटुंबातीलच व्यक्तीच निवडणूक लढवेल, अशी अपेक्षा होती; परंतु नाईक कुटुंबाने निवडणूक लढवण्यास असमर्थता दर्शवल्याने राष्टÑवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे. राजन विचारे हे विद्यमान खासदार असून, त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. परांजपे हे ठाण्यात वास्तव्यास असले, तरी त्यांच्यासाठी हा मतदारसंघ तसा नवाच आहे.

ऐनवेळी त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकण्यात आल्याने त्यांना संपूर्ण मतदारसंघापर्यंत पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. नाईक कुटुंबातील एखादा उमेदवार असता, तर कदाचित येथे चुरशीची लढत झाली असती, असे मत जाणकारांकडून व्यक्त होत आहे. आपल्या कामांची पोचपावती सुज्ञ मतदार देईल, असा विश्वास खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे, या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती राष्टÑवादी करेल, असा दावा आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी केला आहे.

ठाणे हा शिवसेनेचा गड राहिला आहे. मागील निवडणुकीत या पक्षाने दोन लाख ८५ हजार मतांनी सरशी मिळवली होती. यावेळी ती दुप्पट असेल. मतदारांना माहीत आहे, पाच वर्षांत कुणी काम केले आणि कुणी नाही केले. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होणार आहे.
- राजन विचारे,
खासदार, शिवसेना

पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जिल्ह्यातील ज्येष्ठांनी विश्वास टाकून मला उमेदवारी दिली आहे. या निवडणुकीत २००९ ची पुनरावृत्ती होईल आणि आघाडीचा विजय होईल.
- आनंद परांजपे, राष्टÑवादी
शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून विजयाचे दावे-प्रतिदावे होत असले तरी, सेनेला भाजपाची आणि राष्ट्रवादीला काँग्रेसची कितपत मदत होते, यावरही निवडणुकीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.

Web Title: Vichare against Thane Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.