कल्याण मेट्रोसाठी ‘एपीएमसी’चा बळी?, कल्याण स्टेशन परिसरातच स्थानक उभारण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 01:58 AM2017-10-26T01:58:59+5:302017-10-26T01:59:17+5:30
कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणला येणा-या मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असली, तरी त्याच्या स्टेशन आणि कारशेडसाठी कल्याण एपीएमसीच्या जागेचा बळी देण्याचा घाट घातला जात आहे
मुरलीधर भवार
कल्याण : ठाण्याहून भिवंडीमार्गे कल्याणला येणा-या मेट्रोच्या नव्या मार्गाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली असली, तरी त्याच्या स्टेशन आणि कारशेडसाठी कल्याण एपीएमसीच्या जागेचा बळी देण्याचा घाट घातला जात आहे. शेतक-यांची ही जागा देण्यास एपीएमसीचा विरोध असून त्याऐवजी रेल्वे स्थानक परिसरात मेट्रोचे स्थानक उभारावे आणि कारशेड कोन गावात उभारावी, असे त्यांनी एमएमआरडीएला सुचवले आहे.
सध्याच्या बाजार समितीच्या इमारतींचा नव्याने विकास करायचा आणि त्याच्या डोक्यावर मेट्रोची कारशेड आणि स्थानक बांधायचे अशी मूळ कल्पना आहे. तसे झाले, तर बाजार समितीला नंतरच्या काळात कोणतेच बांदखाम करता येणार नाही किंवा पुढील काळात तिचा विकास खुंटेल. त्यातही जनावरांच्या बाजाराचा विकास, सुकामेवा बाजार, शीतगृहे, अन्नधान्य बाजाराचा विकास यासारखे अनेक प्रकल्प बारगळतील, असा बाजार समितीचा दावा आहे. हे सरकार शेतकºयांच्याच जागांच्या मागे का लागले आहे, असा शेतकºयांचा प्रश्न असून त्यांनी मेट्रोला जागा देण्यास ठाम विरोध केला आहे. यावर एमएमआरडीएचे अधिकारी मात्र काहीही बोलण्यास तयार नाहीत.
येत्या चार वर्षांत ठाणे-कल्याण मेट्रो पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे. या मार्गावर १७ रेल्वे स्थानके असतील आणि त्यातील शेवटचे स्टेशन एपीएमसीत उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी यापूर्वीच पाहणीही करण्यात आली होती. ठाणे- भिवंडी- कल्याण मार्गावर आधी मोनो रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव २००७ ला मांडला होता. पण मोनोची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता मेट्रोच्या तुलनेत कमी असल्याने अहवालानंतर तो प्रकल्प बारगळला. तत्कालीन आघाडी सरकारनेही त्यात स्वारस्य दाखविले नाही. नंतर कल्याणला मेट्रो आणण्याची घोषणा करण्यात आली. भाजपा-शिवसेना सरकारने ती पूर्णत्वाला नेण्यासाठी पावले उचलली. ठाण्याहून कल्याणला येतानाचे शेवटचे स्थानक हे कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) दाखवले आहे.
मेट्रोच्या रेल्वे स्थानकाला १५ गुंठे जागा हवी आहे. पण कारशेडसाठी मात्र जादा जागेची गरज आहे. एकदा मेट्रोसाठी जागा दिला, तर बाजार समिती उद््ध्वस्त होईल, असे बाजार समितीचे म्हणणे आहे. बाजार समितीची जागा कल्याण रेल्वे स्थानकापर्यंत पोचण्यास गैरसोयीची आहे. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानकाच्या परिसरातच सॅटिसला जोडून स्टेशन बांधावे, असा प्रस्ताव पुढे करण्यात आला आहे. तसेच कारशेड भिवंडी-कोनदरम्यान उभारण्याचाही प्रस्ताव आहे. मेट्रोला मान्यता देताना कल्याण बाजार समितीच्या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे शेवटचे स्थानक असेल, असे म्हटले आहे. पण त्याबाबत अजून बाजार समितीला काहीही कळविलेले नाही. त्यामुळे विश्वासात न घेता स्थानकाची घोषणा कशाच्या आधारे केली, असा सवाल बाजार समितीच्या पदाधिकाºयांनी केला आहे.
मेट्रो की बिल्ड्रो ? : मेट्रोची खरज गरज डोंबिवलीकरांना आहे. पण त्या शहरात ती न आणता काल्हेर, माणकोली, अंजूरफाटा, भिवंडी, भिवंडी बायपास, रांजनोली, गोवे, कोन, दुर्गाडी या भागातील नव्या गृहसंकुलासाठी- तेथे बिल्डरांच्या घरांना चांगला देण्यासाठी या मार्गावरून मेट्रो आणली जात आहे. त्यामुळे मेट्रोचे नाव बदलून तिला बिल्ड्रो असे नाव देण्याची उपहासात्मक टीका मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केली. ठाणे ते डोंबिवलीदरम्यान मध्य रेल्वेचे प्रवासी लटकून प्रवास करतात. जीवानिशी जातात. त्यांच्यासाठी सरकारकडे उपाय नाहीत, असा टोला त्यांनी लगावला.
एसटी स्टॅण्डवर डोळा : कल्याण स्टेशन परिसातील सध्याचा स्कायवÞक पाडून तेथे ठाण्याच्या धर्तीवर सॅटिस प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यातच मेट्रोच्या स्टेशनसाठी जागा ठेवण्याची राजकीय पक्षांची मागणी आहे. कायमच तोट्या असलेल्या आणि विस्तार करू न शकलेल्या कल्याण-डोंबिवली पालिकेच्या परिवहन सेवेसाठी (केडीएमटी) स्टेशनलगत असलेल्या एसटी स्टॅण्डचा बळी देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्या बदल्यात एसटी स्टॅण्ड खडकपाड्याला नेण्याची मागणी होती, पण ती हाणून पाडल्याने त्या जागेत आता मेट्रो स्टेशन उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
आधीच १५ गुंठे
जागा बाधित
बाजार समितीचे आवार ४० एकरांचे आहे. ही जागा राज्य सरकारने दिलेली आहे. नवी मुंबईच्या बाजार समितीनंतर कल्याणची बाजार समिती राज्यातील महत्त्वाची मानली जाते. येथील ७० टक्के जागेवर बांधकाम झालेले आहे.
उर्वरित जागेवर भाजीपाला, अन्नधान्य बाजार, गोदामे आणि जनावरांच्या बाजारासाठी इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. सध्या फुलबाजाराचे काम सुरू आहे. बाजार समितीचा विकास आराखडा मंजूर असल्याने तेथे अन्य कामाला मंजुरी देता येणार नसल्याचा समितीचा दावा आहे.
बाजार समितीत दिवसाला ३५० ट्रक माल येतो. तेथे भाजीपाल्याचे ३५० होलसेलचे व्यापारी आहेत. कांदा बटाटा आणि फळ विक्रेत्यांची संख्या ८० पेक्षा जास्त आहे. अन्नधान्यांचे १५० व्यापारी आहेत.
एवढ्या मोठ्या उलाढालीच्या ठिकाणी मेट्रोचे स्टेशन आले, तर त्याचा बाजार समितीला फटका बसण्याची चिन्हे आहेत. बाजार समितीची १५ गुंठे जागा यापूर्वीच गोविंदवाडी बायपाससाठी घेण्यात आली आहे.