भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीचा विजय; ठाण्यात भाजपने दिला नारा
By अजित मांडके | Published: August 4, 2024 12:11 AM2024-08-04T00:11:43+5:302024-08-04T00:11:53+5:30
भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची शनिवारी सायंकाळी महत्वपूर्ण बैठक पार पडली.
अजित मांडके (ठाणे), लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : विरोधक केवळ नरेटीव्ह सेट करीत आहेत, त्यांच्या अपप्रचाराला बळी पडू नका असे सांगतानाच आगामी विधानसभा निवडणुक भाजपच्या नेतृत्वाखालीच महायुतीला राज्यात विजय संपादित करायचा आहे. असा कानमंत्र भाजपचे ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर यांनी शनिवारी कार्यकर्त्यांना दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या विस्तारित कार्यकारिणीची शनिवारी सायंकाळी महत्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपचे पालघर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. हेमंत सवरा घोडबंदरच्या वाहतूक कोंडीमुळे पोहचू शकले नाहीत. समारोपाच्या भाषणात केळकर यांनी हा कानमंत्र दिला. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केवळ अपप्रचार केला, नरेटिव्ह सेट करण्याचे काम केले. मात्र आता त्यांच्या या अपप्रचाराला बळी न पडता विधान सभेला विकासकामे घेऊन जनते समोर जा असा सल्लाही त्यांनी दिला. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनचा देखील चुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र या योजनेविषयी जनतेच्या मनातील संभ्रम दूर करण्यासाठी जनतेच्या घराघरापर्यंत जाऊन ही योजना काय आहे हे समजावून सांगा असेही त्यांनी सांगितले. यावेळी भाजपच्या प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, आमदार निरंजन डावखरे, जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांनी नवीन मतदार नोंदणी आणि ज्या ज्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार असतील त्यांना निवडून आणायचे आहे असे सांगितले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव केला गेला. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणूक व महापालिकेच्या निवडणुकीतील रणनीतीबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीला भाजपाचे ठाणे शहर जिल्ह्यातील पदाधिकारी, विविध मोर्चांचे संयोजक व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकारिणी, विविध प्रकोष्टचे संयोजक, प्रभाग अध्यक्ष, शक्तिकेंद्रप्रमुख, बूथ अध्यक्ष आदींसह पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.