शिवसेना नगरसेवक अनंत शिर्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2018 06:20 PM2018-02-07T18:20:35+5:302018-02-07T18:20:51+5:30

न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी (7 फेब्रुवारी)ठाणे येथे झालेल्या फेरमतमोजणीत मीरा भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग ११अ मधून शिवसेना नगरसेवक अनंत शिर्कें यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

The victory of Shiv Sena corporator Anant Shirke | शिवसेना नगरसेवक अनंत शिर्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

शिवसेना नगरसेवक अनंत शिर्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब

Next

मीरारोड - न्यायालयाच्या आदेशाने बुधवारी (7 फेब्रुवारी)ठाणे येथे झालेल्या फेरमतमोजणीत मीरा भार्इंदर महापालिकेच्या प्रभाग ११अ मधून शिवसेना नगरसेवक अनंत शिर्कें यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले. शिर्केंसमोर अवघ्या 9 मतांनी पराभूत झालेले सेनेचे बंडखोर सचिन डोंगरे यांनी फेरमोजणीसाठी न्यायालयात धाव घेतली होती. पण फेरमोजणीत देखील अपयशच पदरी पडले. 2017मध्ये आॅगस्टमध्ये झालेल्या मीरा भार्इंदर महापालिका निवडणुकीत प्रभाग ११ मधून शिवसेनेचे प्रवीण पाटील, संध्या पाटील, वंदना पाटील व अनंत शिर्के हे चारही नगरसेवक विजयी झाले होते.

यातील ११अ या मागासवर्गीयासाठी राखीव प्रभागातून निवडून आलेल्या शिर्के यांना ४ हजार ३० मतं मिळाली होती. तर शिवसेनेच्याच बंडखोर सचिन डोंगरे यांनी शिर्के यांना चांगलाच घाम फोडत ४ हजार २१ मतं मिळवली होती. अवघ्या ९ मतांनी डोंगरे यांना पराभव झाला होता. वास्तविक सचीन डोंगरे हे आधीपासूनच सेनेचे सक्रिय कार्यकर्ते होते. डोंगरेंकडे तरुण कार्यकर्त्यांची चांगली संख्या तसेच थेट संपर्क असल्याने त्यांनी शिवसेनेचे तिकीट मागितले होते. परंतु बौद्ध पंचायतन समिती आदींनी शिर्के यांच्या नावासाठी आग्रह धरल्याने शिवसेनेने डोंगरे यांना डावलून शिर्केंना तिकीट दिले. या भागात सेनेचे प्राबल्य असताना ही डोंगरे यांनी जोरदार मुसंडी मारल्याने शिर्केंचा निसटता विजय झाला.

निकाला नंतर डोंगरे यांनी फेरमतमोजणीची मागणी करत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगास फेर मतमोजणीचे आदेश दिले होते . दरम्यान प्रभाग ११अ च्या निवडणुकीसाठी वापरलेल्या ३० मतदान यंत्रातील मेमरी कार्ड काढून जिल्हाधिकारी कार्यालयातील सुरक्षा कक्षात ठेवण्यात आले होते.

बुधवारी (7 फेब्रुवारी) ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात निवडणूक आयोगाचे उपायुक्त, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत मेमरी कार्ड मधील मतांची पुन्हा मोजणी करण्यात आली. परंतु फेर मोजणीत देखील डोंगरे यांना ४ हजार २१ तर शिर्के यांना ४ हजार ३० इतकीच मतं कायम राहिली. त्यामुळे शिर्के यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या फेरमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

 

Web Title: The victory of Shiv Sena corporator Anant Shirke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.