अनैसर्गिक संबंधांचा व्हिडीओ व्हायरल, युवकाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 01:30 AM2019-01-24T01:30:37+5:302019-01-24T01:30:45+5:30
त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला असून याप्रकरणी चारही आरोपींची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
मीरा रोड : पेणकरपाड्यातील एका तरुणाने गेल्या आठवड्यात केलेल्या आत्महत्येमागील खळबळजनक कारण काशिमीरा पोलिसांनी बुधवारी उघडकीस आणले. याच भागातील चार युवकांनी त्याच्याशी अनैसर्गिक संबंध करतानाचा व्हिडीओ बनवून तो व्हायरल केल्याने कल्पेश खंडागळेची सामाजिक बदनामी झाली होती. त्यामुळेच त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा दावा पोलिसांनी केला असून याप्रकरणी चारही आरोपींची बुधवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
पेणकरपाड्यातील शिव मंदिराजवळच्या किसननगर चाळीत राहणाऱ्या २२ वर्षीय कल्पेश खंडागळेने शुक्रवारी रात्री आत्महत्या केली होती. त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत यामागचे कारण स्पष्ट केले होते. त्यानुसार आशीष म्हात्रे, राजेश चौरसिया, गोपाल देवनाथ आणि राजेश शर्मा यांनी चारपाच महिन्यांपूर्वी एका पार्टीदरम्यान त्याच्याशी अनैसर्गिक संबंध प्रस्थापित केले होते. त्याचा व्हिडीओही त्यांनी बनवला होता. नंतर, तो व्हिडीओ व्हायरल करून कल्पेशची बदनामी त्यांनी चालवली होती. या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. सामाजिक बदनामीमुळे कल्पेश अस्वस्थ झाला होता. यातूनच त्याने आत्महत्येचा मार्ग पत्करला. आरोपींना आधी २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ती संपल्यानंतर बुधवारी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. आरोपींचे मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले असून ते न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जगदीश बांगर यांनी दिली.
>आरोपीचे नातलग राजकारणी
या प्रकरणातील मुख्य आरोपीचे नातलग वजनदार राजकारणी असल्याचा आरोप कल्पेशच्या परिचितांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास प्रभावित होऊ नये, यासाठी तो गुन्हे शाखेकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे.