Vidhan sabha 2019 : निवडणूक कामासाठी पाच हजार कर्मचाऱ्यांची कमतरता
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 01:48 AM2019-09-30T01:48:38+5:302019-09-30T01:49:08+5:30
निवडणूक कामासाठी अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.
- सुरेश लोखंडे
ठाणे : विधानसभा निवडणूक कामासाठी ठाणे जिल्ह्यात ५४ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. सरकारी व निमसरकारी कर्मचा-यांसह विनाअनुदानीत शाळांचे १३ हजार ५०० कर्मचारी मिळून ही गरज भागवणे शक्य आहे. मात्र या शाळांनी न्यायालयात धाव घेऊन निवडणूक कामास नकार दिला आहे. त्यामुळे निवडणूक कामासाठी कर्मचा-यांची उणीव भासण्याची शक्यता आहे. अद्याप पाच हजार कर्मचारी कमी पडत असून, ही गरज भागवताना जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे.
जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी जवळपास सात हजार बूथ तयार केले आहेत. या प्रत्येक बूथवर कमीत कमी पाच कर्मचा-यांसह एका शिपायाची आवश्यकता आहे. या ३५ हजार आवश्यक कर्मचा-यांच्या गरजेसाठी १२५ टक्के कर्मचारी पहिल्या प्रशिक्षणासाठी लागतात.
या सुमारे ४२ हजार कर्मचा-यांसह बीएलओ म्हणून सात हजार कर्मचारी आणि १८ विधानसभा मतदारसंघांच्या आरओ आॅफिससाठी लागणारे पाच हजार कर्मचारी अशा ५४ हजार कर्मचा-यांची जुळवाजुळव जिल्हा प्रशासनास या विधानसभा निवडणुकीच्या कामासाठी करावी लागत आहेत. त्यासाठी प्रशासनाची पुरती दमछाक सुरू आहे.
जिल्ह्यातील सरकारी व निमसरकारी कर्मचाºयांसह शासकीय, तसेच खासगी शाळा आणि विनाअनुदानीत शाळांमधील शिक्षक व कर्मचारी मिळून ५४ हजार कर्मचारी निवडणूक कामासाठी तैनात होणे शक्य आहे.
पण विनाअनुदानीत शाळांनी या कामास नकार देत न्यायालयात धाव घेतली आणि त्यांच्या बाजून निकाला लागला. यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध कर्मचारी संख्येतून तब्बल १३ हजार ५०० विनाअनुदानीत शाळांचे कर्मचारी कमी झाल्यामुळे निवडणूक कामासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाची दमछाक होत आहे.
या समस्येतून मार्ग काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मुंबई आणि उपनगरातून दहा हजार कर्मचारी उपलब्ध केले आहेत. मात्र तरीदेखील पाच हजार कर्मचाºयांची कमतरता असून, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.
प्रशिक्षणाला गैरहजर राहिल्यास कारवाई
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सात हजार बूथ निर्माण करण्यात आले आहेत. त्यासाठी राखीव कर्मचाºयांसह एकूण १२५ टक्के कर्मचाºयांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले. आता दुसºया टप्प्याच्या प्रशिक्षणासाठी यामधील ११० टक्के कर्मचाºयांना प्रशिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी ३९ हजार कर्मचाºयांची गरज आहे. यासाठी निवड झालेल्या कर्मचाºयांनी प्रशिक्षणास उपस्थित राहण्याची गरज आहे. या प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास संबंधित कर्मचाºयांवर त्वरित कारवाई करण्याचे संकेत ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. विधानसभा निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. या राष्ट्रीय कार्यात प्रामाणिक काम करणे आपणा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे या कामासाठी कर्मचारी वर्गाने गैरहजर न राहता उत्स्फूर्तपणे काम करण्याचे आवाहन नार्वेकर यांनी केले आहे.