Vidhan sabha 2019 : केंद्रीय समितीच्या अहवालाने केला आमदार नरेंद्र पवार यांचा घात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:30 AM2019-10-02T02:30:27+5:302019-10-02T02:31:12+5:30
कल्याण पश्चिममधील पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणाºया पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता.
कल्याण : कल्याण पश्चिमेचे भाजप आमदार नरेंद्र पवार हे पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, या मतदारसंघाबाबत फेरविचार करायला हवा, असा पक्षाच्या केंद्रीय पाहणी समितीने दिलेला सुस्पष्ट अहवाल आणि पक्षातील इच्छुकांनी पवारांविरोधात नाराजी व्यक्त करत उमेदवार बदलून देण्याची केलेली मागणी विचारात घेऊन, भाजपने केवळ पवार यांचा पत्ताच कट केला नाही तर, हा मतदारसंघच सेनेला देऊन टाकल्याची माहिती समोर आली आहे.
कल्याण डोंबिवलीतील कल्याण पश्चिम, कल्याण पूर्व, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण या चार मतदारसंघांसाठी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सप्टेंबरमध्ये डोंंबिवलीत पार पडल्या. त्यावेळी कल्याण पश्चिम मतदारसंघातून जवळपास १० उमेदवारांनी मुलाखती दिल्या. मुलाखत घेणाऱ्या पक्षश्रेष्ठींनी निवडणूक रिंगणात का उतरू इच्छिता, अशी इच्छुकांना विचारणा केली असता, त्यांनी स्थानिक आमदाराविरोधात नाराजी असल्याचे मत मांडले होते. पक्षाच्या आमदाराविरोधात १० इच्छुकांनी नाराजी व्यक्त केल्याचा अहवाल मुलाखत घेणा-या पक्षाच्या मंडळीने पक्षाच्या कोअर कमिटीला दिला होता. मुलाखत घेणारी मंडळी हा अहवाल सादर करणार की नाही, याविषयीही साशंकता असल्याने इच्छुकांनी पक्षाध्यक्षांकडे धाव घेऊन उमेदवार बदलण्याची मागणी केली. इच्छुकांपैकी एकाला उमेदवारी देण्याची मागणीही त्यांनी केली. अंतर्गत विरोध आणि केंद्रीय कमिटीचा अहवाल पवार यांच्या नकारात्मक बाबी मांडणारा होता. त्यांची मतदारसंघातील कामगिरी चांगली नसल्याचेही सांगण्यात आले होते. हे मुद्दे विचारात घेऊन पवार यांच्या नावावर काट मारण्यात आली. मात्र इच्छुकांपैकी एकही उमेदवार सक्षम नसल्याने त्यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी देण्याचा विचार पक्षस्तरावर करण्यात आला नाही.
मतदारसंघातील समस्याही ठरल्या अडसर
ना खाऊंगा और ना खाने दुंगा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. याच तत्वाचे पालन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्रीही आग्रही असतात. मात्र मतदारसंघात अशा प्रकारच्या तक्रारीही असल्याचा सूर पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनी आळवला असल्याचे बोलले जात आहेत.
दुसरीकडे, कल्याण पश्चिमेतील शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांनी भाजपच्या विरोधात बंडाचे हत्यार उपसले होते. मित्रपक्षाने दिलेला हा इशाराही नरेंद्र पवार यांची उमेदवारी कापण्यात भर टाकणारा ठरला. याशिवाय मतदारसंघात आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या आहे.
आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी पवार यांनी गेल्या चार वर्षांत मंत्रालयस्तरावर केलेले प्रयत्न तोकडे पडले. त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघातील कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडी पुलाच्या कामात दिरंगाई झाल्याने वाहतूककोंडीचा प्रश्न कल्याणकरांना सतावत आहे.