ठाणे-पालघरमध्ये मनसेची परीक्षा, समस्यांचा अभ्यास सुरू, राज ठाकरेंच्या सभा होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 07:23 PM2019-09-23T19:23:12+5:302019-09-23T19:42:52+5:30
'लाव रे तो व्हिडीओ'मुळे राज यांची चांगलीच चर्चा झाली होती.
- अजित मांडके
ठाणे : लोकसभा निवडणुकीतून माघार घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यात १०० ठिकाणी मनसेकडून उमेदवार दिले जाणार असल्याची शक्यता आहे. यामधील २४ उमेदवार हे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील असणार आहेत. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात मरगळ आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये थोडा का असेना जोश निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आदींसह पालघरमध्ये सभा होणार आहेत. यावेळी ते भाजपच्या विरोधात पुन्हा डरकाळी फोडणार आहेत. याशिवाय, विधानसभेच्या या कठीण परीक्षेत किती टक्के गुण मिळणार, याचाही अभ्यास मनसे करणार आहे.
लोकसभा निवडणुकीत एकही जागा न लढता केवळ 'लाव रे तो व्हिडीओ'मुळे राज यांची चांगलीच चर्चा झाली होती. परंतु, त्यानंतर विधानसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबतही अनेक तर्क-विर्तक लावले जात होते. परंतु, आता मनसेने १०० जागा लढविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ठाणे आणि पालघरमधील सर्वच जागांवर म्हणजेच २४ जागांवर उमेदवार देण्याचा निर्णयही घेण्यात आल्याची माहिती मनसेच्या सुत्रांनी दिली आहे. त्यासाठी प्रचाराचाही अजेंडा जवळजवळ निश्चित झाला आहे. यामध्ये रस्ते, वीज, पाणी आदींसह मूलभूत सोयीसुविधांची वाणवा याची पोलखोल केली जाणार आहे. ठाण्यातील चार मतदारसंघातूनही अशाच प्रकारे प्रचार केला जाणार असून मनसे सत्तेत आल्यास विकासाची हमी सुद्धा दिली जाणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने ठाण्यासह, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि पालघर आदी भागात राज ठाकरे आपल्या खास 'ठाकरी' शैलीत सत्ताधारी भाजपचा समाचार घेणार आहेत. तसेच, 'मोदींची पोलखोल' हा कार्यक्रम या निमित्ताने प्रमुख अजेंडा असणार असल्याची माहिती मनसेच्या सुत्रांनी दिली आहे.
या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसेला मानणारा किंबहुना मराठी मतांचा टक्का किती साथ देणार याचाही अभ्यास केला जाणाप आहे. लोकसभा निवडणूक न लढल्यामुळे मनसेला कुठे किती मते मिळू शकतात, मनसेच्या मतांचा फटका कोणाला बसणार? हे चित्र स्पष्ट होऊ शकले नव्हते. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत या सर्वांचीच उत्तरे किंबहुना विधानसभेच्या या परिक्षेत किती टक्के गुण मिळणार हे स्वत: मनसेला आणि इतर पक्षांना समजणार आहे. याच निवडणुकीत मिळविलेल्या मतांच्या जोरावर मनसेचा महापालिकेचा फॉर्म्युलाही निश्चित होणार असल्याचे बोलले जात आहे.