Vidhan sabha 2019 :...अन्यथा नरेंद्र पवार अपक्ष लढणार, कार्यकर्त्यांचा १२ तासांचा अल्टीमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 01:58 AM2019-10-02T01:58:04+5:302019-10-02T01:58:30+5:30
शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनाला सोडण्यात आली आहे.
कल्याण : शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपात कल्याण पश्चिम मतदारसंघाची जागा शिवसेनाला सोडण्यात आली आहे. ही जागा भाजपला पुन्हा देण्याचा विचार पक्षाने करावा. बुधवारी दुपारी १२ वाजेपर्यंत हा निर्णय न घेतल्यास पक्ष कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार आमदार नरेंद्र पवार हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतील, असा अल्टीमेटम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.
शिवसेनेला ही जागा सोडल्याने पवार यांच्या कार्यालयासमोर मंगळवारी सकाळीच भाजप कार्यकर्ते, इच्छुक उमेदवार जमले. पक्षाध्यक्षांना त्यांनी राजीनामे पाठवून दिले आहेत. सकाळच्या घडोमोडीनंतर सायंकाळी भाजपने महाजनवाडी सभागृहात मेळावा घेतला. या वेळी नाराज पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि आमदार उपस्थित होते. या मेळाव्यात नाराजांचा रेटा पाहता कल्याण पश्चिमेतून पवार यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी मागणी आहे. पक्षाच्या विरोधात कृती करण्याची मनस्थिती नसल्याचे स्पष्ट करत पवार यांनी, कार्यकर्त्यांचा रेटा पाहता अपक्ष उमेदवार म्हणून आपण निवडणूक रिंगणात उतरणार आहोत. भाजपचा मतदारसंघ राखण्यासाठी ही निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार पवार यांनी व्यक्त केला आहे.
उपमहापौर झाल्या भावूक
भाजपच्या या मेळाव्यास कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर यादेखील उपस्थित होत्या. मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करीत असताना पक्षाची जागा शिवसेनेला गेल्याचे कळताच पायाखालची जमीन सरकली, हे सांगत असताना त्या भावूक झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हुंदका त्यांना आवरता आला नाही. त्यामुळे त्या बोलताना जरा थांबल्या.