Vidhan sabha 2019 : कल्याण पूर्वेत बंडखोरी अटळ? बोडारे अपक्ष लढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 01:05 AM2019-10-03T01:05:10+5:302019-10-03T01:05:26+5:30
कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. परंतु, हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी एका बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. उल्हासनगर महापालिकेचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. परंतु, बोडारे यांनी निर्णय झाला की सांगतो, असे स्पष्टीकरण देत बंडखोरीबाबत चुप्पी साधली आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघात २००९ आणि २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष निवडून आलेल्या गणपत गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. परंतु, हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा, अशी मागणी येथील शिवसैनिकांनी केली होती. याठिकाणी शिवसेनेचे वर्चस्व असल्याकडे लक्ष वेधण्यात आले होते. उल्हासनगर महापालिकेतील विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे, माजी नगरसेवक नवीन गवळी, प्रकाश तरे, नगरसेवक महेश गायकवाड, माजी महापौर तथा विद्यमान ज्येष्ठ नगरसेवक रमेश जाधव हे निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र, हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
प्रकाश तरे यांनी मंगळवारी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. ते पूर्वेतून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मतदारसंघ न मिळाल्याने शिवसेनेच्या नाराज स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आता स्वतंत्रपणे उमेदवार उभा करून बंडाचे निशाण फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी पूर्वेकडील एका शिवसेना शाखेत पार पडलेल्या बैठकीत धनंजय बोडारे हे अपक्ष उमेदवार म्हणून लढतील, यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यासंदर्भात बोडारे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता त्यांनी बैठक पार पडल्याचे स्पष्ट करीत निर्णय अद्याप झालेला नाही, तो झाला की कळवतो, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
रॅलीकडे लागले लक्ष : या मतदारसंघात शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. अशातच गुरुवारी भाजपचे गणपत गायकवाड हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यानिमित्त सकाळी ९.३० वाजता रॅली काढण्यात येणार असून, यात शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होतात का, याकडे आता लक्ष लागले आहे. नाराजांची समजूत काढण्यात शिवसेना पक्षश्रेष्ठींना यश येते का, हे पाहणेदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.