Vidhan sabha 2019 : निष्ठावंताची मागणी हवेतच विरली, ठाण्यासाठी सेनेने जोर लावलाच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:04 AM2019-10-02T02:04:24+5:302019-10-02T02:05:17+5:30
एकीकडे ठाणे शहर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही त्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केलीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
ठाणे : एकीकडे ठाणे शहर विधानसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही त्याची मागणी शिवसेनेने भाजपकडे केलीच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केवळ कल्याण पश्चिमसाठीच श्रेष्ठींनी फिल्डिंग लावली होती आणि तो मतदारसंघ मिळविण्यात पक्षाला यश आले आहे. मात्र, ठाण्यातील निष्ठावान शिवसैनिकांच्या तोंडाला वरिष्ठांनी अखेर पाने पुसल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा गड आहे. मात्र, मागील निवडणुकीत केलेल्या चुकीमुळे हा गड शिवसेनेच्या हातून निसटल्याचे शिवसैनिक सांगत आहेत. त्यामुळे तो मिळावा म्हणून त्यांनी आपली मागणी लावून धरली आहे. हा मतदार संघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी शिवसैनिक करीत असले तरी वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघासाठी चर्चाच केली नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. त्यांची चर्चा ही केवळ कल्याण पश्चिम मतदारसंघासाठी होती, त्यानुसार त्यांनी हा मतदारसंघ मिळविला आहे.
कल्याण पश्चिम व ठाणे शहरात भाजपचाच आमदार असतांना जर शिवसेनेने सहज कल्याण पश्चिम आपल्या ताब्यात घेतले आहे. त्यामुळे ठाणे विधानसभाही शिवसेनेला सहज मिळू शकत होती. मग वरिष्ठांनी ही चूक का केली, असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
|
एकीकडे शिवसेनेने कल्याण पश्चिमच्याच दाव्यावर ठाणे हे भाजपला सोडल्याचेही आता स्पष्ट झाले आहे. ठाणे मतदार संघातून सभागृह नेते नरेश म्हस्के, संजय भोईर, रवींद्र फाटक आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांची नावे आघाडीवर होती. म्हस्के यांना पक्षाने कमिटमेंटही दिली होते. असे असताना मग कल्याण पश्चिमच का ठाणे का नाही, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. वास्तविक पाहता, या सर्वांचाच श्रेष्ठींनी पत्ता कट केला असून यापुढेही हा मतदारसंघ भाजपच्याच वाटेला असेल हेही या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडे लक्ष
ठाणे विधानसभा मतदारसंघ हा सुशिक्षित, उच्चभ्रू लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. या परिसरातील मतदारांवर २०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्याचा प्रभाव होता. त्यामुळेच शिवसेनेच्या उमेदवारावर मात करून भाजपने येथे घवघवीत यश मिळवले.
भाजपतर्फे ठाणे शहर मतदारसंघातून संजय केळकर यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. मनसेने अविनाश जाधव यांना रिंगणात उतरवले आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते, येथून कुणाला उमेदवारी देते, यावर येथील लढतीचे चित्र अवलंबून असेल.