‘त्या’ अनाथ मुलांसाठी रस्त्यावरच विद्यादान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 04:13 AM2018-05-19T04:13:36+5:302018-05-19T04:25:52+5:30
मीरा रोडमध्ये कचरावेचक, रस्त्यावर फुगे विकणारे, विविध टपऱ्यांवर मजुरी करुन प्रसंगी भीक मागून पोटाची खळगी भरणा-या जवळपास ५० अनाथ मुलांना एकत्र करुन अनेक वर्षे यास्मिन परवेझ हुसेन यांचे रस्त्यावरच विद्यादान सुरू आहे.
राजू काळे
भार्इंदर : मीरा रोडमध्ये कचरावेचक, रस्त्यावर फुगे विकणारे, विविध टपऱ्यांवर मजुरी करुन प्रसंगी भीक मागून पोटाची खळगी भरणा-या जवळपास ५० अनाथ मुलांना एकत्र करुन अनेक वर्षे यास्मिन परवेझ हुसेन यांचे रस्त्यावरच विद्यादान सुरू आहे.
रस्त्यावरच्या या शाळेतील मुलांना तेथे खाजगी रुग्णालय चालविणाºया डॉक्टर दाम्पत्याने वैद्यकीय आधार देत वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचा वसा घेतल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही मार्गी लागला आहे.
यास्मिन या गृहिणीने २०१५ मध्ये रस्त्यावर कचरा गोळा करणाºया मुलांसाठी शाळा सुरु करण्याची संकल्पना काही परिचितांना बोलून दाखविली. त्याला सकारात्मक पाठिंबा मिळाल्याने सुरुवातीला कचरा वेचणाºया मुलांचा शोध घेतला. त्यात ३० अनाथ मुले शाळेशी जोडली गेली. त्यांना शिक्षण देण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याने त्यांनी शिवार गार्डनच्या फुटपाथवर आठवड्यातून सहा दिवस, दुपारी २ ते सायंकाळी ४ पर्यंत शाळा भरविण्यास सुरुवात केली आणि आता त्या ‘स्ट्रीट टिचर’ म्हणून सुपरिचित आहेत. अठरा विश्वे दारिद्रयात दिवस कंठणारी ही मुले बालवयातच मजुरीचे काम, कचरा वेचणे, रस्त्यावर अथवा लोकल गाड्यांमध्ये भीक मागत असल्याने त्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागते. सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणाचा हक्क दिला. शहरी भागात वस्ती शाळादेखील सुरु केल्या. परंतु, त्याबाबत पुरेशी जनजागृती नसल्याने आजही अनेक शाळाबाह्य मुले शिक्षणापासून वंचित आहेत. अशा मुलांना ज्ञानाचा दिवा दाखविण्यासाठी त्यांना रस्त्यावर शाळा भरवावी लागते. सध्या या शाळेत ५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी स्वत:च्या खिशातून खर्च केला जात असला, तरी काही दानशूर व्यक्ती त्यांना ते साहित्य देणगी स्वरुपात उपलब्ध करुन देतात. या शाळेत शिक्षण घेणाºया मुलांची मोठमोठी स्वप्ने असली तरी त्यांना शहरातील शाळांत अधिकृत प्रवेश मिळाल्यास त्यांची स्वप्ने सत्यात उतरतील, अशी माफक अपेक्षा यास्मिन यांनी व्यक्त केली.
>यास्मिन यांचे हे विद्यादानाचे कार्य शाळेसमोरच एक खाजगी रुग्णालय चालविणारे डॉ. आशीष शाह और डॉ. पूजा शाह या दाम्पत्याच्या नरजेतून सुटले नाही. त्यांनी नुकतीच यास्मिनच्या रस्त्यावरील शाळेची माहिती घेत शाळेला भेट दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत शाळेतील ५० अनाथ विद्यार्थ्यांना वर्षभर मोफत वैद्यकीय उपचार देण्यास सुरुवात केली. तसे वैद्यकीय कार्डही त्यांना देण्यात आले आहे. दर तीन महिन्यांनी या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना आवश्यक औषधे मोफत दिली जातात.