उल्हास नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:25 AM2021-07-19T04:25:13+5:302021-07-19T04:25:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली ...
लोकमत न्यूज नेटवर्क
उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये शनिवारी रात्रीपासून पडणाऱ्या संततधार पावसाने शहराच्या मधोमध वाहणाऱ्या वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली असून नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. स्टेशनकडे जाणाऱ्या वालधुनी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. तर वालधुनी नदी किनाऱ्यावरील शेकडो नागरिकांनी पुराच्या भीतीने, घरातील संसार उपयोगी साहित्य सुरक्षितस्थळी नेऊन घरे बंद करून सुरक्षितस्थळी धाव घेतली आहे.
संततधार पावसाने उल्हास नदी दुथडी भरून वाहत आहे. नदीला पूर आल्यास, पुराचे पाणी नदी किनाऱ्यावरील समतानगर, भारतनगर, वडोलगाव, सम्राट अशोकनगर, रेणुका सोसायटी, संजय गांधीनगर, हिराघाट, शांतीनगर, सी ब्लॉक, मीनाताई ठाकरेनगर आदी परिसरात घुसते. महापालिका आपत्कालीन विभागाचे प्रमुख बाळू नेटके यांनी संततधार व नदीच्या पाण्याचा आढावा घेऊन नदीकिनारी असलेल्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तसेच महापालिकेचे आपत्कालीन पथक तैनात ठेवल्याची माहिती दिली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनच्या पश्चिम बाजूला दुचाकी, रिक्षा व चारचाकी वाहन घेऊन जाणारा एकमेव संजय गांधीनगर येथील वालधुनी नदीवरील पूल शनिवारी रात्रीपासून पाण्याखाली गेल्याने, जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना रस्ता बंद आहे.
वालधुनी नदीतील गाळ व कचरा नदी साफसफाईवेळी बाहेर काढल्याने, पुराचे पाणी अद्याप तरी नागरी वस्तीत घुसले नसल्याची माहिती समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिली. नदीची रुंदी व खोली केल्यास पुराचा धोका कमी होणार असल्याचे रगडे म्हणाले. स्थानिक नगरसेवक व स्थायी समिती सभापती टोनी सिरवानी, गजानन शेळके, सविता तोरणे-रगडे हेही नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्क करीत आहेत.