भातसा धरण परिसरातील पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
By सुरेश लोखंडे | Published: September 8, 2023 09:28 PM2023-09-08T21:28:38+5:302023-09-08T21:29:04+5:30
भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात पडणाऱ्यापावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा वाढला आहे.
ठाणे : भातसा धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे आज दि. 8 सप्टेंबर रोजी सकाळी 8.०० वाजता भातसा धरणाची पाणी पातळी १४०.२४ मी. एवढी असून भातसा जलाशय साठा ९४.९६७ इतका झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात धरणाची वक्रदारे येत्या काही दिवसांत उघडण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भातसा नदी किनाऱ्यावरील सायगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, अशी माहिती भातसा धरण व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता र.भा.पवार यांनी कळविले आहे.
भातसा धरणाच्या जलग्रहण क्षेत्रात पडणाऱ्यापावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा वाढला आहे. त्यामुळे भातसा धरणाची पाणी पातळी, जलाशय परीचलन सुचीनुसार नियमित करण्यासाठी भातसा धरणाचे वक्रदारे येणाऱ्या काही दिवसात उघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामस्वरूप भातसा धरणातून काही प्रमाणात पाण्याचा विसर्ग प्रवाहीत करण्याची शक्यता आहे.
भातसा नदीच्या तिरावरील विशेषतः शहापूर मुरबाड रस्त्यावरील सायगाव पुल तसेच सापगाव व नदीकाठावरील इतर गावांतील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना व गावातील नागरीकांना नदीच्या पाण्याच्या पातळी वाढ होण्यासंदर्भात सूचना व या कालावधीत कोणीही वाहत्या नदीच्या पाण्यात प्रवेश न करण्याबाबत दक्षता घेण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत.