उल्हासनगरच्या महापौरपदासाठी विजय पाटील यांच्या नावाचा आग्रह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 12:45 AM2019-11-17T00:45:52+5:302019-11-17T00:46:04+5:30
ओमी कलानी यांची अप्रत्यक्ष अट; आघाडीत राहण्याचा दिला इशारा
- सदानंद नाईक
उल्हासनगर : भाजपचे नगरसेवक विजय पाटील यांना महापौरपदाचे उमेदवार घोषित करा, तर महापालिकेत भाजप-ओमी टीम, साई पक्षाची आघाडी कायम राहील, असे संकेत ओमी कलानी यांनी दिले आहेत. तर साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी भाजपच्या वरिष्ठांनी शब्द पाळून महापौरपद देण्याची मागणी केली आहे. यामुळे भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.
उल्हासनगर महापालिका महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला आहे. सोमवारी १८ नोव्हेंबरला अर्ज भरण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महापौर पंचम कलानी यांना उमेदवारी न दिल्याने ओमी कलानी टीम नाराज होती. विधानसभा निवडणुकीत भाजपशी फारकत घेऊ न ज्योती कलानी यांना निवडणूक रिंगणात उतवले. महापौर निवडणुकीत महापालिकेतील भाजप-ओमी टीम आणि साई पक्षाची आघाडीपूर्वी इतकीच मजबूत असल्याची प्रतिक्रिया शहराध्यक्ष व आमदार कुमार आयलानी व युवानेता मनोज लासी यांनी दिली. भाजप-ओमी टीमचे ३१, कलानी समर्थक-१ व साई पक्षाचे-११ असे एकूण ४३ नगरसेवक आहेत.
बहुमतासाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. इतर पक्षाचे एकूण सहा नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचे संकेत मनोज लासी यांनी दिल्याने भाजप-ओमी टीम व साई पक्षाचा महापौर निवडून येण्याची शक्यता आहे. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी महापौर अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली. भाजप-ओमी टीम आणि साई पक्षातील नाराज कोणते नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाणे महापालिकेप्रमाणे उल्हासनगरमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडीचा महापौर, उपमहापौर निवडून येण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी कंबर कसली आहे.
शिवसेनेचे एकूण २५ तर रिपाइं ३, राष्ट्रवादी ४ तर भारिप, पीआरपी व काँग्रेसचे प्रत्येकी एक असे ३५ नगरसेवक आघाडीकडे आहेत. साई व भाजपातील ओमी टीमचे नगरसेवक खेचण्यासाठी शिवसेनेने जाळे टाकल्याची चर्चा शहरात रंगली आहे. साई पक्षाचे जीवन इदनानी व ओमी टीमचे ओमी कलानी यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोअर कमिटीकडून चार नावांवर शिक्कामोर्तब
शहर कोअर कमिटीने विजय पाटील, जमनुदास पुरस्वानी, डॉ. प्रकाश नाथानी व महेश सुखरामानी यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. चारही नावे पक्षाच्या वरिष्ठांकडे पाठवली आहेत. विजय पाटील यांना उमेदवारी दिली, तरच महापौर निवडणुकीत आघाडी कायम राहील, अशी भूमिका ओमी कलानी यांनीघेतली आहे.