विकासकाला ४६ कोटींना चुना!, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 12:46 AM2018-02-21T00:46:02+5:302018-02-21T00:46:05+5:30
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ट्रक टर्मिनल प्रकल्प ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्याचे कंत्राट आपल्या कंपनीला मिळाल्याचे भासवून कल्याणमधील बिल्डरने
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा ट्रक टर्मिनल प्रकल्प ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्याचे कंत्राट आपल्या कंपनीला मिळाल्याचे भासवून कल्याणमधील बिल्डरने मुंबईतील विकासकाला त्यात भागीदारीचे प्रलोभन दाखवले आणि त्यात गुंतवलेल्या ४६.५२ कोटींबाबत विचारणा केल्यावर परिवारासह ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
संजय रमेशचंद्र व्यास (४४, रा. गोरेगांव, मुंबई) असे फसवणूक झालेल्या विकासकाचे नाव आहे. व्यास यांची ‘व्यास डेव्हलपर्स’ नामक कंपनी असून जमिनी विकत घेऊन बांधकाम व्यावसायिकांना विकसित करण्यास देण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. जानेवारी २०१४ मध्ये व्यास यांच्या परिचयातील राहुल त्रिभुवन यांनी कल्याण येथील बिल्डर अनिल चंदुलाल शहा यांच्याशी व्यास यांची ओळख करून दिली. शहा यांनी त्यांच्या एसएम असोसिएटसला पालिकेच्या कल्याण येथील १० एकर जमिनीवर ट्रक टर्मिनल विकसित करण्यासाठी ‘बांधा, वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर २००९ ला मिळाल्याचे सांगितले. त्यासाठी खाजगी कंपनीकडून घेतलेले १० कोटींचे कर्ज मुदतीत न फेडल्याने त्या कंपनीने मला नोटीस देऊन हे बांधकाम थांबविले आहे. त्याचप्रमाणे बांधकाम साहित्याची देणी, महापालिकेचे शुल्क, इतर शासकीय करांचा भरणा करण्यासाठी मला २० कोटीची आवश्यकता असल्याचे शहाने व्यास यांना सांगितले. जर १० कोटी रुपये दिले, तर या प्रकल्पात त्यांना ५० टक्के भागीदारी देण्याची तयारी शहाने दाखविली. त्याचप्रमाणे यापूर्वी केलेल्या बांधकामातील विकून शिल्लक राहिलेल्या बांधकामात ५० टक्के भागीदारी देण्याचेही आश्वासन त्याने व्यास यांना दिले. शहाने व्यास यांना एसएम असोसिएटच्या नावे महापालिकेशी झालेला व उपनिबंधक कार्यालयाकडे नोंदणी केलेला करार, सर्च रिपोर्ट दाखवला. त्यावर विश्वास ठेवून व्यास सदर प्रकल्पात गुंतवणूक करण्यास तयार झाले.
मधल्या काळात शहा यांना गरज असल्याने व्यास यांनी त्यांचे मित्र मिलिंद सुर्वे यांच्या आदय मोटर्स कार कंपनीच्या माध्यमातून ८.०१ कोटी रुपये शहा यांना दिले. त्यासंदर्भातील करारनामादेखील २०१६ मध्ये उपनिबंधक कल्याण यांच्याकडे नोंदविण्यात आला. तसेच आपल्याशी संबंधित विविध कंपन्याच्या माध्यमातून व्यास यांनी शहा यांना वेळोवेळी गरजेनुसार काही कोटी रुपये आणि काही रक्कम रोख स्वरुपात दिल्याचे व्यास यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सामंजस्य करारात ठरल्यापेक्षा जास्त पैसे शहा यांना दिल्याने प्रकल्पात भागीदार करुन घेण्याची कागदपत्रे बनविण्यासाठी व्यास यांनी शहाकडे आग्रह धरला. मात्र, जेव्हा या प्रकल्पासाठी अधिक कर्ज मिळवण्यासाठी ते बँकेत गेले तेव्हा त्यांना कागदपत्रे बनावट असल्याचे बँकेने दाखवून दिले. मॅथ्यू कुंचिन, अनिल शहा आणि सीमा शहा यांनी संगनमत करुन एसएम असोसिएटस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या नावाशी साम्य असलेली एसएम असोसिएटस ही नवी कंपनी स्थापन करुन प्रकल्पाचे काम त्यांच्या या कंपनीला मिळाल्याचे भासवून फसवणूक केल्याचे व्यास यांच्या लक्षात आले. या प्रकल्पातील बेसमेंट हे पार्किंगसाठी राखीव असतानाही त्यामधील बांधकाम कसे विकले, हा प्रश्न व्यास यांनी शहा यांना केल्यावर त्यांनी उत्तर देण्याचे टाळले. प्रकल्पातील १० टक्के बांधकाम विकण्याचा अधिकार आपल्याला असल्याचा त्यांनी दावा केला, मात्र तो बनावट ठरला. आपल्याकडून पैसे घेऊनही महसूल, आयकर आदी अनेक कर भरले नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. या व्यवहारात मी अनिल शहा यांच्या कंपनीला ४६.५२ कोटी रुपये दिल्याचा तपशील त्यांनी दिला.
त्यानुसार अनिल चंदुलाल शहा, सीमा शहा, मॅथ्यू जॉन कुंचिन, विल्सन मॅथ्यू, रोशना खान आणि सुभाषसिंग ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे (ठाणे शहर) सहायक पोलीस आयुक्त एस. टी. अवसरे करीत आहेत.