ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू झाली विकसित भारत संकल्प यात्रा झाली सुरू
By प्रज्ञा म्हात्रे | Published: November 28, 2023 06:06 PM2023-11-28T18:06:15+5:302023-11-28T18:06:42+5:30
सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे पालिकेचे उद्दीष्ट : आयुक्त बांगर
प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी ॲपलॅब चौक, मॉडेला मिल नाका येथील शिबिरात झाला. महापालिका क्षेत्रात एकूण ७४ ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. आजचे दुसरे शिबीर साई हॉस्पिटल, शिवाजीनगर या भागात झाले. पीएम स्वनिधी या फेरीवाल्यांसाठी असलेल्या कर्ज योजनेत मुंबई महानगर क्षेत्रात ठाण्याने चांगली कामगिरी केली आहे. तसेच, पीएम ई बस या योजनेच्या पहिल्या टप्प्यातही ठाणे शहराचा समावेश झाला आहे. त्यातूून फेब्रुवारी २०२४ पर्यंत १०० बसगाड्या उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
महापालिका बांगर यांनी या यात्रेचे उद्दीष्ट स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त नागरिकांना या उपक्रमाची माहिती देणे आणि सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे हे यात्रेचे उद्दीष्ट असल्याचे आयुक्त बांगर म्हणाले. देशभरात असे रक्ष सर्वत्र जाणार आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात ७४ ठिकाणी ही यात्रा जाईल असे सांगितले. स्वच्छ भारत अभियानाचा संदेश पोहोचवणे हाही या यात्रेचा उद्देश आहे. स्वच्छतेच्या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. रस्त्यावरील धूळ, कचरा, डेब्रिज याचा त्यांना पराकोटीचा तिटकारा आहे. त्याबद्दल ते वेळोवेळी निर्देश देतात. या सर्व योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि माध्यमांनी सहकार्य करावे, असे आवाहनही बांगर यांनी केले.
पीएम स्वनिधी या योजनेतून कर्ज मिळालेल्या स्नेहा जाधव, संगीता गुरव, माणिकराव आठवले आणि खैरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. कोरोनाच्या काळात वाईट परिस्थिती असताना पीएम स्वनिधीतील कर्जाने खूप मोठा आधार दिला. ही योजना ठाणे महापालिकेमार्फत समजली आणि त्याची अमलबजावणीही वेगाने झाली, असे लाभार्थी म्हणाले. ही पीएम स्वनिधी योजना म्हणजे नवसंजिवनी योजना आहे, असेही त्यांनी सांगितले. शुभारंभाच्या कार्यक्रमात, आ. ॲड. निरंजन डावखरे, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेवक संजय वाघुले, विकास रेपाळे, नम्रता भोसले, तसेच, सुजय पत्की, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदी मान्यवर सहभागी झाले.