विखे-पाटील, चव्हाण उद्या कल्याणमध्ये, जनसंघर्ष यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 01:32 AM2019-01-23T01:32:39+5:302019-01-23T01:32:49+5:30
एकीकडे परिवर्तन संकल्प यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांची विशेष सभा नुकतीच कल्याण पूर्वेत पार पडली.
कल्याण : एकीकडे परिवर्तन संकल्प यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांची विशेष सभा नुकतीच कल्याण पूर्वेत पार पडली. त्यापाठोपाठ आता जनसंघर्ष यात्रेनिमित्त काँग्रेसची गुरुवारी कल्याणमध्ये जाहीर सभा होत आहे.
या सभेत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदी प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत.
कल्याण-डोंबिवली शहर काँग्रेस कमिटीतर्फे ही सभा गुरुवारी सायंकाळी पश्चिमेत होणार आहे. या सभेला कल्याण-डोंबिवली शहर आणि परिसरातील महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, अनुसूचित जाती विभाग व अन्य सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, ज्येष्ठ नेते, आजी-माजी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी आणि प्रतिनिधी यांनी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्व मध्ये झालेल्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी देश व राज्य पातळीसह स्थानिक मुद्यांवर परखड
भाष्य केले होते. त्या पाठोपाठ आता काँग्रेसची सभा होत आहे. त्यात अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि राधाकृष्ण विखे पाटील सत्ताधाऱ्यांवर कशी झोड उठवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.