विक्रमडमधील ओंद्याचा झेंडू गुजरातच्या मार्केटमध्ये!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 01:15 AM2020-02-23T01:15:43+5:302020-02-23T01:15:54+5:30
आठ एकरमध्ये ऐंशी हजार झेंडूची लागवड, सध्या भाव पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत
- राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यातील शेतकरी आता आपल्या शेतामध्ये शेतीव्यतिरिक्त अन्य जोडपिके घेऊ लागलेले आहेत. त्यातूनच सध्या हंगामी वातावरणानुसार फुलशेतीची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढलेला दिसत आहेत. ओंदे गावातील संजय सदानंद सांबरे, निलेश चंद्रकांत पाटील, मनोज मधुकर पवार व विजय दत्तात्रय पाटील या चार शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एकत्रितरीत्या आठ एकरमध्ये रेड कलकत्ता व पिवळा पितांबरी या जातीच्या झेंडू फुलांची तब्बल ८० हजार रोपांची लागवड केली आहे. सध्या जवळजवळ चार ते पाच दिवसांच्या अंतराने जवळ जवळ तीन टन दोनशे किलो झेंडू काढला जात असून तो थेट गुजरातच्या (वापी, बलसाड, सुरत) बाजारपेठेत विक्रीसाठी जात आहे. प्रथम सिझनमध्ये झेंडूला चांगला भाव मिळाला. परंतु सद्यस्थितीत या फुलांची मागणी जरी कमी असली तरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असल्याने झेंडूचा भाव पडलेला आहे. अवघ्या २० ते २५ रुपये किलोने झेंडू विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असल्याची माहिती ओंदे येथील झेंडू उत्पादक शेतकरी संजय सदानंद सांबरे यांनी दिली.
विक्रमगड तालुका हा निसर्गरम्य व हवामानाच्या दृष्टीने उत्तम तसेच सुपीक प्रकारची जमीन असलेला तालुका आहे. येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळी भात लागवड तर उन्हाळी भाजीपाला कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची अशा प्रकारची पिके घेतली जातात. मात्र गेल्या काही वर्षापासून विक्रमगड तालुक्यात फुलशेती पिकाची लागवड शेतकरी हिवाळी व उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. या वर्षी तालुक्यात हिवाळी हंगामात भालीपाला तसेच फुलशेतीचीही लागवड शेतकºयांनी केली आहे. गेल्या वर्षीही तालुक्यातील शेतकºयांनी फुलशेतीची लागवड केली होती.
झेंडूचे पीक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे आहे. या पिकाच्या लागवडीचा खर्च व मजुरांची गरज सुद्धा कमी प्रमाणात लागते. ओंदे येथील गावातील शेतकºयांनी आपल्या शेतीच्या जागेत, कुटुंबाच्या मदतीने कलकत्ता जातीच्या झेंडूची लागवड केली आहे.
आम्ही कुटुंबाच्या मदतीने चार शेतकरी मिळून आठ एकरामध्ये रेड कलकत्ता व पिवळा पितांबरी जातीच्या ८० हजार झेंडू फूल रोपांची लागवड केलेली आहे. सद्यस्थितीत झेंडूचे भाव पडलेले असून किलोमागे अवघे २० ते २५ रुपये पदरात पडत असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. किमान ४५ ते ५० रुपये भाव मिळावयास हवा.
-संजय सदानंद सांबरे, झेंडू उत्पादक, ओंदे गाव.
फुलशेती लागवडीस हवामान योग्य
तालुक्यात फुलशेती लागवडीस हवामान व जमीन योग्य आहे. या लागवडीकरिता बियाणे, खत, मजुरी, ट्रॅक्टर असा मिळून जवळपास अर्धा ते एक एकरास ३० ते ४० हजार रुपये खर्च येतो. या पिकाच्या लागवडीनंतर फक्त ८ दिवसांतून एकदा पाण्याची पाळी द्यावी लागते, तर एकदा खत घालावे लागते. या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नसल्याचे शेतकºयांकडून सांगण्यात येते. तसेच एक ते दोन मजूर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करू शकतात. तालुक्यात हवामान व जमीन फुलशेती पिकास अनुकूल असल्याने या शेतकºयांनी लागवड केलेल्या झेंडू फूलशेतीस भरघोस पीक आले आहे.