गावविकास आराखडा हाच खरा पुढच्या पिढीचा पाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2020 11:42 PM2020-11-09T23:42:44+5:302020-11-09T23:43:11+5:30
ठाण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही जिल्हास्तरीय कार्यशाळा सोमवारी पार पडली.
ठाणे : एखाद्या गावाची समस्या, गावाच्या आवश्यक गरजा आदींची माहिती त्या गावातील गावकऱ्यांना व्यवस्थितपणे माहीत असते. त्यामुळे गावाचा विकास आराखडा गावकऱ्यांनी तयार केल्यास तो पुढच्या पिढीचा पाया ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त करून ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, यांनी ‘आमचा गाव आमचा विकास’ या कार्यशाळेतील उपस्थित अधिकारी यांना मार्गदर्शन केले.
ठाण्यातील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही जिल्हास्तरीय कार्यशाळा सोमवारी पार पडली. त्यात ‘ग्रामपंचायत विकास आराखडा’ कसा तयार करावा, याचे प्रशिक्षण विविध आस्थापनांवर कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक गावच्या गावकऱ्यांनी स्वत:च्या गावाचा वार्षिक आणि पंचवार्षिक विकास आराखडा तयार करणे महत्त्वाचे आहे. असे केल्याने गावाच्या विकासाला चालना मिळेल, असेही त्यांनी यावेळी निदर्शनात आणून दिले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) चंद्रकांत पवार यांनी करून उपक्रमाचे महत्त्व आणि रूपरेषा अधिकारी यांंच्या लक्षात आणून दिली.