घोडबंदर गावात बिबट्याचा वावर, ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 02:43 AM2018-09-25T02:43:16+5:302018-09-25T02:43:44+5:30
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर गावात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतील घोडबंदर गावात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ग्रामस्थ तथा उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी संजय गांधी राष्टÑीय उद्यान, बोरिवली आणि नागपूर वनविभागाला पत्रव्यवहार केला असून त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे सांगितले.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सीमेजवळच घोडबंदर गाव असल्याने येथे बिबट्यांचा वावर असल्याचे अनेकदा समोर आले आहे. काही दिवसांपासून बछड्यांसह बिबट्यांची संख्या वाढल्याने गावात त्यांचा वावरही वाढल्याचे ठिकठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजवरून निदर्शनास आले आहे. हे बिबटे पूर्वी रात्रीच्या वेळी गावात येत असत.
आता मात्र ते अनेकदा संध्याकाळीच गावात दिसत असल्याचे अनेकांनी सांगितले. याची तातडीने दखल घेत उपमहापौरांनी १९ सप्टेंबर रोजी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे मुख्य वनसंरक्षक तसेच नागपूर येथील वनविभागाला पत्रव्यवहार करत गावात फिरणाºया बिबट्याला जेरबंद करण्याची विनंती केली आहे.
बिबट्यांचा वावर मुख्यत्वे दत्त मंदिर, मॉडर्न कंपनी वसाहत, साईनाथ सेवानगर, नेहरूनगर, घोडबंदर किल्ल्यालगतचे एमटीडीसी रेस्ट हाउस आणि बामणदेव नागरी वस्त्यांत बिबट्या अनेकदा फिरताना आढळल्याचे त्यांनी म्हटले
आहे.
बिबटे घोडबंदर किल्ला परिसरात आश्रयाला असल्याचा अंदाज आहे. त्या परिसराला लागूनच अनेक घरे असल्याने तेथील लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे या बिबट्यांना त्वरित जेरबंद करण्याची मागणी केली आहे.