एक गाव एक होळीची परंपरा!

By admin | Published: March 22, 2016 02:03 AM2016-03-22T02:03:00+5:302016-03-22T02:03:00+5:30

आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे

A village is a tradition of Holi! | एक गाव एक होळीची परंपरा!

एक गाव एक होळीची परंपरा!

Next

राहुल वाडेकर,  तलवाडा
आधुनिक काळाच्या ओघात सर्वच सणांचे रुप पालटत असले तरी विक्रमगड तालुक्यातील अनेक गावात प्रामुख्याने ग्रामीण खेडया-पाडयात आपटी, आलोंडा, तलवाडा, डोल्हारी, सारशी, दादडे, आदीविध भागात मात्र आजही पारंपारिक पध्दतीनेच सण साजरे करण्यांत येतात़ या गावात एक गाव होळीची परंपरा आजही अबाधित ठेवली आहे़ याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत प्रत्येक सोसायटी, नगरात छोटया मोठया होळया पेटवून नंतर धुळवडीचे रंग उधळले जातात़ मात्र ग्रामीण भागात आधुनिक युगाामध्येही एक गाव एक होळी अशी वर्षानुवर्षाची परंपरा आजही सुरु आहे़
पहिले तीन दिवस छोटया होळया, चौथ्या दिवशी चोरटी होळी आणि शेवटच्या म्हणजेच २३ मार्चला पाचव्या दिवशी मोठी होळी असा पाच दिवस होळीचा सण साजरा केला जातो़ या पाच दिवसांत लहान मुले वाजवत असलेल्या डफऱ्यांचा (डफली) आवाज आजही शिमग्याच्या पारंपारिकतेची ग्वाही देत आहे़ चोरटी होळीसाठी तरुण गावातूनच लाकडे चोरुन आणतात़ पाचव्या दिवशी सर्व ग्रामस्थांच्या सहभागाने मोठी होळी रचली जाते़ या होळीची पारंपारिक पध्दतीने पूजा केली जाते़ गावातील नवविवाहीत जोडप्यांनी या होळीभोवती पाच फेऱ्या मारण्याची पध्दत आहे़ त्यानंतर होळी पेटविली जाते़ होळीत भाजलेल्या नारळांचा प्रसाद घेण्यासाठी सर्वांचिच झुंबड उडत असते़ साखरेच्या पाकापासून तयार केलेले हार लहान मुले होळीच्या दिवशी गळयात घालत असतात दरवर्षी ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते त्या जागेला होळीची माळ असे म्हणतात़ याच माळावर पाच दिवस विविध खेळ, गरबानृत्य, मनोरंजनात्मक कार्यक्रम होतात. तर ग्रामीण खेडया पाडयावर तारपा नृत्य, ढोलनाच, लेझीम, व सामूहिक गरबानृत्य असे विविध कार्यक्रम रात्रभर खेळले जातात़
होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलीवंदनाच्या दिवशी घरोघरी पुरणपोळया केल्या जातात़ धुलीवंदनाला मनसोक्त धुळवड खेळली जाते़ तर रंगपंचमीला गावाकडे झाडा-फुलांपासुन तयार केलेले नैसर्गीक रंगच वापले जातात़
विक्रमगड तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणजे विक्रमगड शहर तसे गावागावात आठवडाबाजार भरतात परंतु सणाकरीता विक्रमगड शहरातून खरेदी करण्याची एक वेगळीच प्रथाच आहे़ त्यानुसार होळीसाठी सद्यस्थितीत विक्रमगड बाजार फुललेला आहे. आजूबाजूच्या खेडयावरील आदिवासी चार दिवस गर्दी करीत असून पोस्त मागण्याकरीता कुणी पुरूष महिलेच्या वेशात तर कुणी महिला पुरूषाच्या वेशात तर कुणी तोंडाला अंगाला रंग लाऊन, वेगळा पेहराव करुन फुटलेल्या पत्र्याचा डबा वाजवत, तोंडाला मुखवटे लाऊन घराघरातून व दुकानदारांकडून पोस्त मागत आहे़ हाच प्रकार धुलीवडी पर्यत चालत असतो. तर विक्रमगड बाजारात हारगाठ्या, काकणे, नारळ, रंग, पिचकाऱ्या याची खरेदी तडाखेबंद होते आहे. आदिवासींकडुुन जपली जात आहे होळीची परंपरा. होळी हा सण सर्वांसाठी खूप महत्वाचा व आनंददायी असून या सणाची तयारी घराघरातून होतांना दिसत आहे़ यापाश्वभूमीवर खेडया-पाडयातील आदिवासी आपल्या पूर्वजापासून चालत आलेल्या रितीरिवाज व परंपरेनुसार हा सण साजरा करण्यात मग्न असल्याचे चित्र सध्या विक्रगमगड व परिसरातुन पाहावयास मिळत आहे़
होळीच्या दिवशी भेंडीचे झाड (फांदी)अगर बांबुच्या फांदया होळीमाता म्हणून आणून त्याची पूजा केली जाते़ पूजेला गव्हाच्या, तांदळाच्या, नागलीच्या, कुरडई पापडया, पुरणपोळी आदी घरी बनवलेल्या पदार्थांचा नैवैद्य दाखविला जातो़ बांबू किंवा भेंडींच्या फांदीला टोकाला खेडयावर अगर रितीप्रमाणे जिवंत कोंबडीचे पिल्लू बांधले जाते ही प्रथा आजही आबाधीत आहे़ त्याचप्रमाणे नविन लग्न झालेली जोडपी आपल्या पत्नीला खांदयावर घेवुन होळी मातेला प्रदक्षिणा घालण्याची अशी प्रथा असून त्याची आजही अंमलबजावणी होत आहे. ़ (वार्ताहर)
>सर्वसामान्य माणसांला जगणेही नकोसे करुन टाकलेल्या महागाईचा फटका यावर्षी होळीसणालाही बसला आहे़ सध्याच्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे़ त्यामुळे कर्ज काढुन सण साजरे करण्याची वेळ आली आहे़
भाजीपाला, कडधान्ये अशा वस्तुबरोबर जीवनावश्यक वस्तुंचे वाढलेले प्रचंड दर सध्या सर्वाच्याच आवाक्याबाहेर गेले आहेत़ त्यामुळे प्रत्येक सणाला वस्तूंच्या किंमती वाढत असुन होळीसाठी असलेली गाठी (साखरेची माळ) यंदा महागली आहे़ पिचकाऱ्यांचे दरही वाढलेले आहेत़ महागाई कितीही वाढली असली तरी सण मात्र त्याच दिमाख्यात साजरे केले जात आहेत़
> डहाणू, तलासरी, तालुक्यातील हजारो आदिवासी मजूर एक दोन दिवसांवर येऊन ठेपलेली होळी साजरी करण्यासाठी पुन्हा जंगलाकडे निघाले आहेत. डहाणू तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई-अहमदाबाद हायवेच्यापलीकडील भागातील शेकडो गाव-पाड्यांमध्ये रोजगाराचे कोणतेच साधन नसल्याने येथील हजारो आदिवासी मजूरीसाठी डहाणू, वानगांव, चिंचणी, बोईसर, पालघर, मनोर, वसई सारख्या शहरी भागात येऊन हाताला मिळेल ते काम करुन आपली उपजिवका चालवित असतात. शिवाय सण, उत्सव, साजरे करण्यासाठी देखील माालकांकडून सुट्टी मिळत असल्याने दरवर्षी सायवन, बापूगाव, निंबापूर, चरी, कोटबी, कैनाड, दापचरी, वंकास तसेच तलासरी तालुक्यातील कुर्झे, उधवा, भागातील ही कुटुंबे स्थलांतर करतात.

Web Title: A village is a tradition of Holi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.