गावखेडी जोडणार सॅटेलाइटद्वारे, मुंबईसह पालघर- ठाण्यावरील नैसर्गिक संकटांवर मात करणे शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 01:00 AM2019-11-29T01:00:53+5:302019-11-29T01:01:52+5:30
मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीला समुुद्रातील चक्रीवादळांपासून धोका आहे, या चर्चेस नुकत्याच झालेल्या ‘महा’ चक्रीवादळापासून महत्त्व आले.
- सुरेश लोखंडे
ठाणे : मुंबईसह पालघर व ठाणे जिल्ह्याच्या किनारपट्टीला समुुद्रातील चक्रीवादळांपासून धोका आहे, या चर्चेस नुकत्याच झालेल्या ‘महा’ चक्रीवादळापासून महत्त्व आले. यावर केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करून संभाव्य नैसर्गिक आपत्तीवर तत्काळ मात करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असून यासाठी ठाण्यासह भिवंडी तालुक्यातील गावखेडी सॅटेलाइट प्रकल्पाद्वारे जोडण्यासाठी चाचपणीही केली आहे.
मुंबईसह पालघर व ठाणे शहरास चोहोबाजूने समुद्राने वेढले आहे. त्यास लागून पालघर व ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहरांसह गावे आहेत. त्यांचे समुद्रातील चक्रीवादळांपासून नुकसान होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यावर वेळीच मात करणे शक्य व्हावे, यासाठी उद्भवणाऱ्या आपत्तीची माहिती वेळीच मिळावी आणि त्यावर तत्काळ उपाययोजना करता याव्यात, या दृष्टीने प्रशासकीय हालचाली सुरू आहेत.
यासाठी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाद्वारे दुर्गा प्रसाद नावाच्या अधिकाºयाने सॅटेलाइट प्रकल्पांसाठी भिवंडी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या गावखेड्यांची दोन दिवसांपूर्वी चाचपणी केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. ही योजना प्रत्यक्षात आल्यास किनारपट्टीवरील गावांना त्याचा निश्चितच फायदा होणार आहे.
संभाव्य धोक्यांची दोन दिवसांपूर्वी झाली चाचपणी
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन नुकतेच क्यार व महा या नावाची जीवघेणी चक्रीवादळे तयार झाली होती. यातील क्यारपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर, ‘महा’ धोकादायक चक्रीवादळापासून बचाव करण्यासाठी राज्यस्तरीय प्रशासनासह महापालिका, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायती पातळीवरील यंत्रणांना तत्काळ सतर्क केले होते. संभाव्य ठिकाणी जिल्हा प्रशासनाने रेड अलर्टही जारी केले.
यासाठी केंद्रीय कार्यालयाद्वारे राज्यासह जिल्हा आणि तालुकापातळीच्या यंत्रणेपर्यंत जावे लागले. मात्र, सॅटेलाइट प्रकल्पास जोडल्यानंतर तत्काळ संबंधित ठिकाणी वेळीच संपर्क करून त्यास संभाव्य धोक्याची, आपत्तीची माहिती देणे शक्य होणार आहे. या दृष्टीने ठाणे, भिवंडी शहरांसह गावखेडे, समुद्रकाठावरील बंदरांची चाचपणी सुरू आहे. यानुसार, दोन दिवसांपूर्वी भिवंडीसह उत्तनसारख्या बंदराची प्राथमिक चाचपणी झाली.
उत्तन-डहाणू, सातपाटी यांसारख्या बंदरांना मिळणार संरक्षण
केंद्रीय आपत्ती नियंत्रण विभागास मिळणारी नैसर्गिक आपत्ती, संकटाची माहिती संबंधित जिल्ह्यास, तालुक्यास आणि ग्रामपंचायत विभागास तत्काळ कळवता यावी, यासाठी येथील कार्यालये वॉकीटॉकी, सॅटेलाइट प्रकल्पास जोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
यामुळे समुद्रातील चक्रीवादळांसारख्या संकटांसह अन्यही नैसर्गिक संकटांची माहिती तत्काळ संबंधित उत्तन, डहाणू, सातपाटीसारखी मच्छीमार बंदरे, शहरे आणि गावखेड्यांना देऊन संरक्षण करता येईल.
त्यावर वेळीच उपाययोजना शोधून संभाव्य धोक्यावर मात करणे शक्य होईल. यासाठी शहरांसह गावेदेखील सॅटेलाइट, वॉकीटॉकी यासारख्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानास जोडण्यासाठी जिल्ह्यातील गावखेड्यांची चाचपणी करून सर्वेक्षणाच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत.