ग्रामस्थांची पाण्यासाठी होत आहे ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 11:59 PM2019-05-24T23:59:52+5:302019-05-24T23:59:56+5:30

गंभीर परिस्थिती : ‘ठक्कर बाप्पां’तर्गत विहिरीचा फायदा कधी

The villagers are getting water for water | ग्रामस्थांची पाण्यासाठी होत आहे ससेहोलपट

ग्रामस्थांची पाण्यासाठी होत आहे ससेहोलपट

Next

जनार्दन भेरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भातसानगर : तालुक्यातील गावपाड्यात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला, तरी असे अनेक गावपाडे असे आहेत, ज्यांची पाण्यासाठी फरफट आजही सुरू आहे. त्यापैकीच डोंगरवाडी, फणसवाडी, रिकामवाडी, करपटवाडी या गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. डोंगरवाडीपाड्यातील महिलांना तर एक दीड किमी अंतरावरील नदीतून पाणी आणावे लागत असल्याचे चित्र आहे. या पाड्याच्या खाली विहीर असून या विहिरीतील पाण्याचा वापर ढाढरे, डोंगरवाडी आणि इतर पाड्यांतील लोक करत असतात. मात्र, यंदा या विहिरीतील पाणीच आटल्याने मोठी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.


आदिवासी विकास विभागाच्या ठक्कर बाप्पा योजनेंतर्गत तिचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात ही विहीर भरून किती पाणी पुरेल, ते पुढील वर्षी पाहायला मिळेल. सध्या या पाड्यात टँकरने पाणी मिळणे आवश्यक आहे. दोन ते अडीच हजार लोकसंख्या असलेल्या या पाड्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे टँकरने पाणी पुरवण्याची गरज असल्याचे नागरिक सांगत आहेत.


शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई अधिक व्यापक होत असून दिवसेंदिवस गावपाड्यांना पाणीपुरवठा करणे मोठे जोखमीचे ठरणार आहे. पाणीपुरवठा केला जात असलेल्या गावांची संख्या १९० वर पोहोचली आहे. तरी, आम्हालाही टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या गावपाड्यांची संख्या अधिक आहे. गेल्याच आठवड्यात काही गावपाड्यांनी मागणी करूनही त्यांना अद्याप पाणीपुरवठा सुरू झालेला नाही.

या पाड्यात गंभीर पाणीटंचाई असून टँकरने पाणी पुरवण्याची नितांत गरज असल्याने टँकरने पाणी पुरवावे.
- कमल भोईर, उपसरपंच


जेजे प्रस्ताव आमच्याकडे मंजुरीसाठी आले, तेते सर्व मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले आहेत. - एम.बी. आव्हाड, उपअभियंता

Web Title: The villagers are getting water for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.