उल्हासनगरातील उल्हास नदीच्या घाटावरून वादंग, म्हसोबा घाट नाव देण्याची गावकऱ्यांची मागणी
By सदानंद नाईक | Published: April 5, 2023 03:07 PM2023-04-05T15:07:53+5:302023-04-05T15:08:05+5:30
घाटाला एक नव्हेतर मिथिला घाट, साई झुलेलाल व म्हसोबा घाट असे तीन नावे दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.
उल्हासनगर : कॅम्प नं-१ येथील रिजेन्सी अंटेलिया शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीवरील घाटाच्या नामकरणावरून वाद निर्माण झाला. म्हारळ, वरप व कांबा गावकऱ्यांनी घाटाचे नाव म्हसोबा ठेवण्याची मागणी केली असून या घाटाला एक नव्हेतर मिथिला घाट, साई झुलेलाल व म्हसोबा घाट असे तीन नावे दिल्याची माहिती आमदार कुमार आयलानी यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील संच्युरी कंपनी शेजारून बारमाही वाहणारी उल्हास नदी वाहत असून नागरिकांच्या सोयीसाठी रिजेन्सी व अंटेलिया येथे उल्हास नदीवर आमदार कुमार आयलानी यांनी आमदार निधीतून घाट बांधण्याचे काम गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. या घाटाला पर्यावरण प्रेमींनी आक्षेप घेऊनही घाटाचे काम सुरू आहे. नुकतेच सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते घाटाचे उदघाटन झाले असून घाट बनविण्यापूर्वी त्याठिकाणी म्हसोबा यांचे मंदिर असल्याने, घाटाला म्हसोबा घाट नाव द्या. अशी मागणी वरप, कांबा, म्हारळगावा मधील नागरिकांनी लावून धरली. त्यासाठी त्यांनी आमदार कुमार आयलानी यांची भेट घेतली. याप्रकारने अप्रत्यक्षपणे घाटाच्या नामांतरावरून गावकरी विरुद्ध आमदार असा सामना रंगण्याची शक्यता निर्माण झाली.
दरम्यान उल्हास नदीवर एमआयडिसीने बंधारा बांधून नदी पात्रात विहीर खोदून पाणी पंपिंग स्टेशन उभे केले. नदी पात्रातील पाणी उचलून उल्हासनगरसह इतर शहराला पाणी पुरवठा करण्यात येते. पंपिंग स्टेशन शेजारीच शहरातील सांडपाण्याचा खेमानी नाला नदीला मिळतो. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. अशी ओरड झाल्यावर महापालिकेने कोट्यावधी रुपयांची योजना राबवून नाल्यातील सांडपाणी अडवून व उचलून मलनिस्सारण केंद्रात नेऊन उल्हास खाडीत सोडले जाते. त्याच ठिकाणी मात्र थोडे पुढे आमदार आयलानी यांनी उल्हास नदी घाट बांधण्याचे काम सुरू केले. घाट पूर्ण होण्यापूर्वीच वादात सापडला असून घाटासाठी नदी किनाऱ्यावरील झाडे, झुडपे तोडून किनारा सफाट केला. मात्र पावसाळ्यापूर्वी घाटाचे काम पूर्ण न झाल्यास, नदीच्या पुराचे पाणी शेजारील परिसरात घुसण्याची शक्यता निर्माण झाली.
पर्यावरणवादी विरोधात
उल्हास नदी पात्रातून पाणी उचलून शेजारील शहरांना एमआयडीसी पुरविले जाते, त्याच ठिकाणी घाट बांधण्यात येत असल्याने नदीचे प्रदूषण होऊन तिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्हे उभे राहणार असल्याचे भीती त्यांनी व्यक्त केली.