भाईंदरच्या तारोडी ग्रामस्थांचा रस्ता रुंदीकरणास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 08:03 AM2019-05-11T08:03:51+5:302019-05-11T08:05:47+5:30
भाईंदरच्या तारोडी गावातील ग्रामस्थांनी महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरणास विरोध करत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे.
मीरारोड - भाईंदरच्या तारोडी गावातील ग्रामस्थांनी महापालिकेने हाती घेतलेल्या रस्ता रुंदीकरणास विरोध करत आंदोलनाचा पावित्रा घेतला आहे. त्यासाठी शनिवारी सायंकाळी तारोडी ग्रामस्थांनी जाहिर सभेचे आयोजन केले आहे. ग्रामस्थांच्या विरोधात स्थानिक नगरसेवक देखील सहभागी होणार असुन आम्हाला रुंदिकरणाची गरज नसताना महापालिका कोणाच्या इशारायावर आणि कोणाच्या फायद्यासाठी रुंदीकरणाचा घाट घालत आहे ? असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे.
भाईंदरच्या डोंगरी गावापासून पुढे तारोडी हे गाव आहे. गावात सुमारे दिडशे घरं असुन ५०० च्या वर लोक वस्ती आहे. आजही गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात शेती, भाजीपाला लागवड करतात. तारोडी गावाच्या पुढे धारावी देवी मंदिर आणि चौक धक्का जवळ बालेपीर शाह दर्गा आहे.
विकास आरखड्यात १२ मीटरचा रस्ता दर्शवला असला तरी गावातील ग्रामस्थांना सद्याचा असलेला १२ ते १५ फुटाचा रस्ता पुरेसा असुन त्यांची कोणतीही रस्ता रुंदीकरणाची मागणी नाही. धारावी मंदिर ट्रस्टने देखील रस्ता रुंदिकरणाची कोणतीही मागणी चालवलेली नाही. सुमारे सात वर्षां पुर्वी परिसरातील हेरल बोर्जिस यांनी रस्ता रुंदीकरणाचा प्रयत्न केला होता. पालिकेने कामाची निविदा देखील काढली होती. परंतु ग्रामस्थांनी जोरदार विरोध केल्याने रुंदीकरणाचे काम गुंडाळावे लागले होते.
त्यातच गेल्या महिन्याभरापासून रस्ता रुंदीकरणाच्या हालचाली महापालिकेसह स्थानिक भाजपा आमदार नरेंद्र मेहता व भाजपाच्या काही स्थानिक पदाधिकारायांनी चालवल्या आहेत. गेल्या महिन्यात येथील दोन घरांच्या कुंपण भिंती पालिकेने तोडुन टाकल्या होत्या. गुरुवारी देखील आ. मेहता व पालिका अधिकारायांनी सर्वेयर सह रुंदीकरणाबाबत पाहणी केली. डोंगरी चर्चची जागा सुध्दा यात बाधीत होत असुन पुढे स्थानिक शेतकरायांची घरं, शेतजमीनी आदी रुंदीकरणात जाणार आहेत. ग्रामस्थांसह त्यांच्या तारोडी डोंगरी येथील मुळ ख्रिश्चन रहिवाशांची सार्वजनिक संस्थने रुंदीकरणास विरोध चालवला आहे.
बालाजी खतगावकर (आयुक्त, महापालिका ) - लोकांच्या सहमतीनेच डोंगरी पासुन रस्ता रुंदीकरण करण्यास घेतले आहे. तारोडी ग्रामस्थ जर विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करुन रुंदीकरणाचे काम करु .
हेरल बोर्जिस ( भाजपा मंडळ अध्यक्ष ) - सद्या तरी फक्त डोंगरी पासुन पुढे वेडेवाकडे असलेले वळण पर्यंत रुंदीकरण केले जाणार आहे. त्याच्या पुढे रस्ता रुंदीकरण होणार नाही असे प्रशासनाकडून समजले आहे.
विद्याधर रेवणकर ( ग्रामस्थ तथा धारावी मंदिर ट्रस्टचे खजिनदार ) - धारावी मंदिर ट्रस्टने रस्ता रुंदीकरणाची कोणतीही मागणी केलेली नाही. मंदिर ट्रस्ट आणि तारोडी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून एकत्र आहोत. ग्रामस्थांच्या निर्णया सोबत मी आहे.
मॅक्सवेल दालमेत (खजिनदार, तारोडी डोंगरी येथील मुळ ख्रिश्चन रहिवाशांची सार्वजनिक संस्था ) दर्गाच्या दिशेला दिवसा व रात्री अपरात्री हुल्लडबाजी करत भरधाव वेगाने जाणाऱ्यामुळे ग्रामस्थ त्रासले आहेत. गतीरोधक सुध्दा काढुन टाकले गेले. वाढत्या रहदारी सोबत कधी नव्हे त्या गावात चोराया व्हायला लागल्या आहेत. आम्हाला रस्ता रुंदीकरणाची आवश्कता नाही. मग कोणाच्या फायद्यासाठी रुंदीकरणाचा घाट घातला जातोय ?