टंचाईच्या विरोधात रामपूरच्या ग्रामस्थांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:52 AM2021-06-16T04:52:59+5:302021-06-16T04:52:59+5:30
मुरबाड : तालुक्यातील रामपूर येथील आदिवासी बांधवांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई भेडसावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची ...
मुरबाड : तालुक्यातील रामपूर येथील आदिवासी बांधवांना ऐन पावसाळ्यात पाणीटंचाई भेडसावत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. याची दखल घेत आदिवासींनी ‘लोकमत’च्या वृत्ताचे बॅनर तयार करून मुरबाड पंचायत समितीवर टंचाई दूर करून ग्रामसेविका पाणीपुरवठा अधिकारी, सरपंच व कंत्राटदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
धसई परिसरातील रामपूर येथील आदिवासी बांधवांची विहीर सुस्थितीत असताना केवळ कंत्राटदाराच्या फायद्यासाठी ग्रामसेविका, पाणीपुरवठा अधिकारी व सरपंच यांनी संगनमताने आदिवासींना पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था न करता ती विहीर ऐन पावसाळ्यात तोडल्याने आदिवासी बांधवांना पाणीटंचाई भेडसावत आहे. ते डबक्याच्या पाण्यावर आपली तहान भागवत आहेत. यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. म्हणून त्यांनी गटविकास अधिकारी रमेश अवचार यांना घटनास्थळी येऊन पाहणी करण्याची विनंती केली. त्यांनी भेट दिली असता सुस्थितीत असणारी विहीर तोडल्यामुळे निर्माण झालेल्या टंचाईचे वास्तव बघितले व ग्रामपंचायतीकडे विहिरीच्या बांधकामासंबंधी मिळालेल्या प्रशासकीय मंजुरी तसेच कागदपत्रे यांची मागणी केली असता त्यांनी त्यांच्या स्तरावर हे काम सुरू केले असल्याचे समजले.
या प्रकरणामुळे आदिवासी समाज संघटना व प्रशासन यांच्यात संघर्ष नको म्हणून गटविकास अधिकाऱ्यांनी आदिवासींची पाण्याची पर्यायी व्यवस्था केली जाईल असे आश्वासन दिले. परंतु प्रशासन या गंभीर बाबींची दखल घेत नसल्याने ‘लोकमत’ने १३ जून रोजी वृत्त प्रकाशित केले. सोमवारी बातमीचे बॅनर घेऊन आदिवासींनी मुरबाड पंचायत समितीवर धडक दिली. गटविकास अधिकाऱ्यांनी रामपूर येथे टँकरची व्यवस्था केली व गुरुवारी पाणीपुरवठा अधिकारी, सरपंच, ग्रामसेविका व कंत्राटदार यांची बैठक बोलवून पुढील कारवाईचे आश्वासन दिले.