गावविकासासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:47 AM2021-02-17T04:47:51+5:302021-02-17T04:47:51+5:30

ठाणे : गावच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. ...

Villagers should work together for village development | गावविकासासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने काम करावे

गावविकासासाठी ग्रामस्थांनी एकदिलाने काम करावे

Next

ठाणे : गावच्या सर्वांगीण विकासात ग्रामपंचायतीची महत्त्वाची भूमिका असते. प्रत्येक ग्रामपंचायत स्वयंपूर्ण झाली तर राज्याच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल. यासाठी गावाच्या विकासासाठी मतभेद व मनभेद विसरून गावकऱ्यांनी सामूहिक एकजूट दाखवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

नियोजन भवन येथे ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने २०१८-१९चा स्मार्ट ग्राम पुरस्कार व २०१९-२० चा आर.आर.(आबा) पाटील सुंदर गाव या पुरस्कारांचे वितरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी ठाणे जिल्ह्यातील १२ ग्रामपंचायतींना तालुका आणि जिल्हास्तरीय पुरस्काराने गौरवले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, आरोग्य व बांधकाम समिती सभापती कुंदन पाटील, कृषी व पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे आदींसह अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा परिषद सदस्य सुभाष घरत, रेखा कंठे आदी उपस्थित होते.

ग्रामविकासासाठी आबांनी मांडलेल्या संकल्पनेवर आजही गावविकास सुरू आहे. लोकोपयोगी व सामाजिक एकोपा जपण्याची स्वयंप्रेरणा जनमानसात रुजवण्याचे काम आबांनी केले, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले. ठाणे जिल्ह्यातील गावे राज्यासाठी आदर्श निर्माण करणारी व्हावीत असा सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयातून गावच्या विकासासाठी नियोजन करावे, असेही त्यांनी सुचवले. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे आदींनी मत मांडले.

‘विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही’

प्रत्येक गाव सुंदर व सक्षम करण्यासाठी पुढाकार घ्यावा यासाठी शासन आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिले.

फाेटाे : १६ठाणे सुंदर गाव पुरस्कार

Web Title: Villagers should work together for village development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.