खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा 

By धीरज परब | Published: July 12, 2024 05:56 PM2024-07-12T17:56:03+5:302024-07-12T17:56:53+5:30

ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

villagers warn the municipal corporation to protest against illegal activities in khadi | खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा 

खाडी पात्रातील बेकायदा कामांविरोधात ग्रामस्थांचा महापालिकेला आंदोलनाचा इशारा 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या भ्रष्ट कारभारा मुळे शहराचे वाटोळे होत असून भाईंदरच्या मुर्धा , राई व  मोर्वा गावातील नैर्सगिक खाड्यां मध्ये बेकायदा भराव करून बेकायदा बांधकामे केली गेल्याने तसेच पालिकेने प्रक्रिया न करताच मलमूत्र - सांडपाणी खाडीत बेकायदा सोडल्याने तिन्ही गावातील भूमिपुत्रांना विविध गंभीर समस्या भेडसावत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे . महापालिका आयुक्त संजय काटकर यांची भेट घेऊन ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने दिला आहे . 

मुर्धा, राई, मोर्वा गावातील अनेक ग्रामस्थांच्या भूमिपुत्र सामाजिक समन्वय संस्थाच्या वतीने अध्यक्ष अशोक पाटील , सचिव जागृती म्हात्रे सह धनेश्वर पाटील , नंदकुमार पाटील , राई गावपंच अध्यक्ष भगवान पाटील , आगरी एकता  मंडळाचे अध्यक्ष प्रशांत म्हात्रे , नंदकुमार भोईर , केसरीनाथ भोईर आदींनी महापालिका आयुक्त संजय काटकर यांना भेटून गावातील समस्यांचा पाढा मांडला .  शहरातील दुषित सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट नैसर्गिक खाडी पात्रांमध्ये सोडणे व कचरा टाकणे . खाडी पात्रांवर अनधिकृत माती भराव व अनधिकृत बांधकाम सातत्याने होत असल्यामुळे नैसर्गिक खाडी पात्रे बुजत गेली व अरुंद होत चालली आहेत . मलमूत्र - सांडपाणीचा गाळ व कचरा मुळे खाडीपात्रांमध्ये तीवरांची झपाट्याने वाढ होत गेली आहे आणि नैसर्गिक खाडीपात्रे बुजत गेली. 

दूषित सांडपाण्यामुळे भरतीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी दूषित झाल्याने स्थानिक भूमिपुत्र शिलोत्र्यांचा मीठ उत्पादनाचा व्यवसाय बंद होत चालला आहे . खाडीमात्रांमध्ये ग्रामस्थांचा मासेमारीचा व्यवसाय बंद पडला आहे. भात शेतीमध्ये साचणार्या पावसाच्या अतिरिक्त पाण्याचा निचरा बंद झाल्याने भातशेती नापीक झाली आहे . पावसाळ्यात गावांमध्ये पाणी साचून गटाराचे दूषित सांडपाणी मधून ये-जा करावी लागते.  दलदल व दुर्गंधी पसरली आहे . 

खाडीपात्रांवरील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे तात्काळ हटवून भराव काढून टाकून खाडी पात्र मोकळी आणि रुंद करावीत . बेकायदा भराव आणि अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणाऱ्या  सुविधा देणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावे . खाडी किनाऱ्यांचे सुशोभीकरण करून जॉगिंग आदी सुविधा कराव्यात .  खाडी पात्रांमध्ये सोडले जाणारे बेकायदा सांडपाणी प्रक्रिया करून सोडावे तसेच मलनिःसारण प्रकल्प उभारावा अशी मागणी महापालिका आयुक्तांना केल्याचे ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सांगितले. 

 ह्या आधी देखील खाडी पात्रातील अतिक्रमणाची पाहणी पालिका अधिकाऱ्यांनी करून देखील त्यावर कारवाई केली गेली नाही उलट मोठ्या प्रमाणात भराव आणि बेकायदा बांधकामे वाढली असल्याचा आरोप देखील संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी केला . दरम्यान आयुक्तांनी पुढील आठवड्यात आपण प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार असल्याचे व पाहणी नंतर कारवाईचे नियोजन केले जाईल असे आश्वासन दिल्याचे पाटील म्हणाले . 

Web Title: villagers warn the municipal corporation to protest against illegal activities in khadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.