अंबरनाथमधील गावांना गावठाणांचा दर्जा, मुख्यमंत्र्यांचे एमएमआरडीएला कारवाईचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:00 AM2018-08-14T03:00:59+5:302018-08-14T03:01:26+5:30
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गावांना लवकरच एमएमआरडीएकडून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशान्वये एमएमआरडीएला अंबरनाथ पालिका हद्दीतील गावांना गावठाण दर्जा देण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील गावांना लवकरच एमएमआरडीएकडून दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशान्वये एमएमआरडीएला अंबरनाथ पालिका हद्दीतील गावांना गावठाण दर्जा देण्यासाठी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच अंबरनाथमधील गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे.
झपाट्याने वाढणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका हद्दीत अनेक गावांचा समावेश आहे. यात कानसईगाव, मोरिवलीपाडा, मोरिवलीगाव, जांभिवली, जावसई, ठाकूरपाडा, फणसीपाडा, कोहोजगाव, चिखलोली ठाकूरवाडी, वांद्रेपाडा, अंबरनाथगाव, अंबरनाथपाडा, पालेगाव आदी गावांचा समावेश आहे. मात्र, या गावांना गावठाणांचा दर्जा अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे जुन्या नियमानुसार बांधकाम आणि विकासासाठी एक चटई निर्देशांक मिळत होता. गावांची वाढणारी हद्द आणि त्यांच्या आसपास वेगाने होणारा विकास पाहता त्या ठिकाणी पूरक चटई निर्देशांक मिळणे आवश्यक असते. त्यासाठी गावठाण दर्जा महत्त्वाचा असतो. मात्र, अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील १२ गावांना गावठाणांचा दर्जा मिळाला नव्हता. त्याचा परिणाम विकासावर होत होता. त्यासाठी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी शासनाकडे मागणी केली होती.
संपूर्ण प्रक्रि या झाल्यानंतर तो प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला. त्यावर त्यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर, नगरविकास विभागाच्या कार्यासन अधिकाºयांनी एमएमआरडीएच्या आयुक्तांना यासंदर्भात पत्र दिले
आहे.
त्यानुसार, भूमापन नकाशे, कागदपत्रे आणि गुणवत्ता तपासून कलम ३७ अन्वये कारवाई पूर्ण करण्यासाठी हालचाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या अहवालानंतर याबाबत नगरविकास विभागाकडून निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. अनेक गृहसंकुलेही उभी राहत आहेत.
दोन चटई निर्देशांक मिळणार
गावठाणाचा दर्जा मिळाल्यास या गावांच्या आसपासच्या ५०० मीटरच्या परिघाच्या आतील बांधकामांना दोन चटई निर्देशांक मिळणार आहे. त्यामुळे विकासाला चालना मिळण्याची आशा आहे.