जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये आता एटीएमद्वारे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 01:26 AM2020-01-05T01:26:38+5:302020-01-05T01:26:46+5:30

शहरांमध्ये वॉटर-मीटर बसवून पाणीपुरवठा करण्याची पद्धत आहे.

In villages in the district, now water through ATMs | जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये आता एटीएमद्वारे पाणी

जिल्ह्यातील गावखेड्यांमध्ये आता एटीएमद्वारे पाणी

Next

सुरेश लोखंडे 
ठाणे : शहरांमध्ये वॉटर-मीटर बसवून पाणीपुरवठा करण्याची पद्धत आहे. यासाठी ठाणे महापालिकेसह बहुतांश महापालिका सक्रिय झाल्या आहेत. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेने याही पुढे जाऊन पाणीपुरवठ्यासाठी एटीएम पद्धत सुरू केली आहे. त्यात एक रुपया टाकल्यानंतरच फिल्टर केलेले एक लीटर शुद्ध पाणी ग्रामस्थांना मिळू लागले आहे. तर, १० रुपये टाकल्यानंतर २० लीटर पाण्याची बादली ग्रामस्थांना भरून मिळत आहे. यातून पाणीपट्टीची वसुली रखडणार नसून पाण्याचा मनमानीपणे गैरवापर टाळता येणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या नियंत्रणातील गावखेड्यांमध्ये पाणीपट्टीवसुलीची समस्या सध्या गंभीर झाली आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावखेड्यांमध्ये होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी एटीएम पद्धतीची मात्रा पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एच.एल. भस्मे यांनी लागू केली. जिल्ह्यातील १४ ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर ही पद्धत सध्या सुरू केली आहे. शहापूर तालुक्यातील दळखण येथील एटीएममध्ये रोज एक हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त गल्ला मिळत आहे. काही ठिकाणी ४०० ते ५०० रुपये जमा होत आहेत. या जमा होणाºया रकमेतून ग्रामपंचायतीला नळपाणीपुरवठा योजनेची देखभाल व दुरुस्ती करणे सहज शक्य होणार असल्याचे भस्मे यांनी निदर्शनात आणून दिले.
>१४ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग
जिल्ह्यात प्रथम भिवंडी तालुक्यातील वडवली, पुंडास, साखरोली, मोहिली, दुगाडगाव, कासणे, पडघा, खानिवली, वाहुली आदी गावांना, तर शहापूरच्या दळखण, कल्याणच्या कांबा, वरप, अंबरनाथच्या कान्होर, चामटोली आदी १४ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर वॉटर एटीएम प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे.
याप्रमाणेच शहापूरच्या कळंभे, वासिंद, खातिवली, चेरपोली, आसनगाव, वेहळोली, खर्डी, बिरवाडी आणि खर्डी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना आदी ठिकाणी बसवण्याचे आदेश जारी झाले आहेत. या उपयुक्त व नावीण्यपूर्ण योजनेचा लाभ ग्रामस्थांना करून देण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघातील २५ गावांमध्ये वॉटर एटीएमची मागणी केली आहे.
याप्रमाणेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी २१ गावांची शिफारस केली आहे. तर, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोक घरत यांनी सात गावे, प्रकाश तालवरे यांनीही सात गावांची, तर भिवंडीच्या उपअभियंत्यांकडून ७८ गावांची शिफारस करून वॉटर एटीएमची मागणी लावून धरली आहे.
>दोन कोटी खर्चातून
वॉटर फिल्टर एटीएम
नावीन्यपूर्ण योजनेतून जिल्हाधिकाऱ्यांकडून यास निधी मिळाला आहे. एक कोटी ९० लाख रुपयांच्या निधीतून ही वॉटर फिल्टर व वॉटर एटीएम योजना जिल्ह्यातील गावखेड्यांच्या पाणीपुरवठा योजनांसाठी राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेने गावखेड्यांना शुद्ध पाणीपुरवठा देण्याच्या जबाबदारीतून ही योजना हाती घेतली आहे.
पाणी विकत घेण्याची
सवय लागेल
या वॉटर एटीएमद्वारे पाणीपट्टी जमा करून योजनेच्या देखभाल व दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीला या रकमेचा वापर करता येणार आहे. ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची सवय लागेल. यातून या योजनेची देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेच्या निधीची गरज भासणार नाही. महत्त्वाचे म्हणजे पाण्याच्या होणाºया मनमानी वापरास आळा बसून पाण्याचा अपव्यय टळण्यास मदत होणार आहे.

Web Title: In villages in the district, now water through ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.