विमुक्त जाती, भटक्या जमातींचे विद्यार्थी वाऱ्यावर!
By admin | Published: July 27, 2015 01:46 AM2015-07-27T01:46:07+5:302015-07-27T01:46:07+5:30
राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन
मुंबई : राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातींच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षक आणि शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांनी चार दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. परिणामी, महाविद्यालयातील विद्यार्थी वाऱ्यावर आहेत, पण सामाजिक न्याय विभागाने मात्र या आंदोलनाकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वि.जा.भ.ज. कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षेकत्तर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष प्रा. सी.के. शिंदे यांनी सांगितले की, २६ जून २००८ सालच्या शासन निर्णयानुसार टप्पा अनुदान तत्त्वावर राज्यात १४८ कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्यात आली. दऱ्या-खोऱ्यात, पाडा, तांड्यावर राहणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील बंजारा, धनगर, वंजारी, केवट, भोई, झिंगाभोई, बेलदार अशा विविध जातीमधील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे. टप्पा अनुदानामध्ये २०१२-१३ सालापासून २५ टक्के, २०१३-१४मध्ये ५० टक्के, २०१४-१५ साली ७५ टक्के, आणि २०१५-१६ साली महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान मिळणे अपेक्षित होते. मात्र शासन स्तरावर दरवर्षी टाळाटाळ होत असल्याने महाविद्यालये अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. परिणामी, महाविद्यालयीन शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
परिणामी, शासनाविरोधात शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. मात्र सामाजिक न्याय विभागाने अद्याप शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे संघर्ष समितीचे म्हणणे आहे. परिणामी, आंदोलनाचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. शिक्षणापासून कोसो दूर असलेल्या भटक्या आणि विमुक्त समाजाचे विद्यार्थी महाविद्यालय बंद असल्याने उनाडक्या करत फिरत असल्याचे शिक्षकांनी सांगितले.