मी आज जे धडपड करु पाहतोय त्याचे बीज विनय आपटे यांनी रोवले : मंदार देवस्थळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2019 04:59 PM2019-01-06T16:59:03+5:302019-01-06T17:04:11+5:30
सुयश कला क्रीडा मंडळ आयोजित व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प मंदार देवस्थळी यांनी गुंफले.
ठाणे: विनय आपटे यांचा विषय निघाला की मी भावूक होतो. मी आज जे धडपड करु पाहतोय त्याचे बीज त्यांनी रोवले. १९९५ साली बोलाची कढी या मालिकेतून त्यांचे आणि माझे सूर जुळले. त्यांच्या कामाचा आवाका, त्यांची काम करण्याची पद्धत झपाटून टाकणारी होती अशा भावना दिग्दर्शक, लेखक मंदार देवस्थळी यांनी व्यक्त केल्या.
सुयश कला क्रिडा मंडळ, ठाणे पुर्व यांच्यावतीने आयोजित केलेल्या व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प दिग्दर्शक, लेखक मंदार देवस्थळी यांनी गुंफले. ही व्याख्यानमाला श्री सिद्धीविनायक मंदिराच्या पटांगणात संपन्न झाली. ते म्हणाले की, माझ्या बाबांना नाटकाची तर आईला सिनेमाची आवड होती. शाळेत वक्तृत्व, गीतपठण, अभिनय अशा स्पर्धांत मी आवडीने सहभागी व्हायचो. अभिनय मला अजून आवडतो हे सांगताना त्यांनी अभिनय ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. ज्येष्ठ कॅमेरामन बाबा सावंत यांच्याकडून मला खूप शिकायला मिळाले. कोणत्याही दृश्याचा कसा विचार करायचा, ते प्रेक्षकांपर्यंत कसे पोहोचवायचे हे मी त्यांच्याकडून शिकत गेलो. सुरूवातीचे सहा महिने मी फक्त त्यांचे निरीक्षण करीत होतो. अभिनय आणि दिग्दर्शन याची उत्तम सांगड त्यांनी घातली. यावेळी विनय आपटे यांच्याबद्दल सांगताना ते भावूक झाले होते. ते म्हणाले की, दिग्दर्शन करीत असताना त्यांना पाहणे हा माझ्यासाठी दुर्दैवाने छोटा काळ राहीला. १९९७ साली अभिनेत्री या मालिकेतील त्यांच्या आठवणी त्यांनी प्रेक्षकांसमोर कथन केल्या. विनय आपटे यांच्या बोक्या सात बंडे, वळवाचा पाऊस, सांगाती, मनामनाच्या व्यथा या साप्ताहीक मालिकांमध्ये त्यांनी कार्यकारी संपादक म्हणून माझे नाव दिले. मी आयुष्यात त्यांना विसरु शकत नाही. आभाळमाया सारखी मालिका त्यांनी मला दिली आणि या मालिकेने मला थोडी वेगळी ओळख करुन दिली असल्याचे त्यांनी सांगितले. आशिष जोशी यांनी त्यांची मुलाखत घेतली.