करियरमध्ये उंची गाठण्यासाठी अनेक वर्ष तपस्या करावी लागते- विनिता ऐनापुरे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2019 10:19 PM2019-03-09T22:19:15+5:302019-03-09T22:19:53+5:30
पै फेण्ड्स लायब्ररी आणि कांचनगौरी महिला पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री कर्तृत्वाचा महनीय अविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डोंबिवली- कोणतीही महिला आपल्या करियरमध्ये उत्तुंग शिखर गाठते ते तिला एका दिवसात मिळविता येत नाही. आपले नाव एक उंचीवर नेण्यासाठी त्यांना खूप काळ प्रयत्न करावे लागतात. गेली ३५ वर्ष मी लिखाण करीत आहे तेव्हा आता कुठे त्याला मान्यता मिळत आहे, असे मत सुप्रसिध्द लेखिका विनिता ऐनापुरे यांनी व्यक्त केले.
पै फेण्ड्स लायब्ररी आणि कांचनगौरी महिला पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्री कर्तृत्वाचा महनीय अविष्कार या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. स्त्रीच्या अंगीभूत कुशलतेमुळे कामातील, सुबकतेमुळे चिकाटी व कुशाग्र बुध्दीमुळे महिला आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर असून आपल्या कार्यकर्तत्वाचा ठसा त्यांनी समाजमनावर उमटविला आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सायंकाळी प्रकाशन क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऐनापुरे बोलत होत्या. शुभम सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. संगीता चव्हाण, विद्या फडके, अनुपमा उजगरे, नम्रता मुळे, वैशाली मेहेत्रे, शुभांगी पांगे या प्रकाशन क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पै फेण्ड्स लायब्ररीचे पुडंलिक पै आणि कांचनगौरी महिला पतपेढीच्या उर्मिला प्रभूघाटे, मुक्त पत्रकार मीना गोडखिंडी आदी मान्यवर उपस्थित होते.
ऐनापुरे म्हणाले, समाजाचा विरोध पत्कारून आपल्या पत्नीला पुढे पाठविणे हे सोपे नव्हते तरीही ते काम गोपाळरावांनी केले. त्यांनी आनंदीबाईंना पुढील शिक्षणासाठी परदेशात पाठविले. महात्मा फुले हे देखील सावित्रीबाईंच्या मागे ठामपणे उभे होते. स्त्रियांना घरातून वाव मिळतो तेव्हाच ती निश्चितपणे कार्य करू शकते. आज ही एक ही असे क्षेत्र नाही त्या क्षेत्रात महिला नाही. या सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटविण्यासाठी स्त्रियांना झगडावे लागले आहे. पण नाउमेद कुणीच झाले नाही. स्त्रियांनी व्यवसाय क्षेत्रात ही पावले टाकायला सुरूवात केली आहे. पण प्रकाशन हा व्यवसाय इतर व्यवसायापेक्षा वेगळा आहे. एखादया लेखकांचे लिखाण त्या वाचतात. त्यांना पटले तर ते छापण्याचा निणर्य घेतात. ते लिखाण पटले नाही तर प्रश्न उरत नाही. परंतु ते लिखाण छपाई करण्याचा निर्णय घेतल्यास त्यांचे खरे काम तिथून सुरू होते. प्रकाशकाला संयम ठेवावा लागतो. त्या व्यतिरिक्त मुखपृष्ठ, कागदाचा दर्जा, बायडिंग असे विविध प्रकाराची कामे करावी लागतात. वाचक हा त्यातील महत्त्वाचा घटक असतो. त्याने या व्यवसायाकडे पाठ फिरविता कामा नये. प्रकाशकाला लेखकांची जात, धर्म या गोष्टीशी काहीच देणं घेणं नसते म्हणूनच हा व्यवसाय वेगळा आहे, असे ही त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललिता छेडा आणि धनश्री साने यांनी केले तर प्रास्ताविक उर्मिला प्रभूघाटे आणि पुडंलिक पै यांनी केले. प्रकाशक महिलांनी ही आपले मनोगत व्यक्त केले.