दादांचा तो हुंदका म्हणजे नाटक, विनोद तावडे यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 02:12 AM2019-10-01T02:12:45+5:302019-10-01T02:13:08+5:30
कधी दादा रागावतो तर कधी दादा हुंदका काढतो. पण, हे नाटक आहे. चॅनलवर जे दाखवतात, त्यातील १०० टक्के खरंच असते, असे नाही.
ठाणे : कधी दादा रागावतो तर कधी दादा हुंदका काढतो. पण, हे नाटक आहे. चॅनलवर जे दाखवतात, त्यातील १०० टक्के खरंच असते, असे नाही. आपल्या मनावर व्हिज्युअल इफेक्टचा जास्त परिणाम होत असतो. त्यामुळे दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते, असा टोला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी नाव न घेता अजित पवार यांना लगावला. युवकांना राजकारणात येण्याचे तसेच डोळसपणे मतदान करण्याचे आवाहन करून या क्षेत्रात सगळे वाईटही नाही आणि चांगलेही नाही.
सगळ्याच पक्षांत चांगली-वाईट माणसे असल्याचे ते म्हणाले. भाजपा युवा मोर्चातर्फे केबीपी महाविद्यालयात युवकांशी संवाद साधणाऱ्या कॉफी विथ युथ या कार्यक्रमाचे सोमवारी आयोजन केले होते. यावेळी तावडे यांनी विद्यार्थ्यांमध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन संवाद साधला. राजकारणात कोणाला यायचे? त्यांच्या या प्रश्नावर कमी विद्यार्थ्यांनी हात वर केले, तेव्हा त्यांनी सध्याच्या राजकारणावर बोट ठेवून नामोल्लेख टाळूना पवार यांना टोला लगावला. ३७० कलमचा कित्ता तावडे यांच्याकडूनही आजच्या कार्यक्रमात गिरवण्यात आला.
विद्यापीठाचा अभ्यासक्रम अपडेटेड नाही, या प्रश्नावर उत्तर देताना येत्या दोन वर्षांत अपडेटेड अभ्यासक्रम मिळणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. पेपर रिचेकिंग होऊन आला की, जास्त मार्क्स मिळतात, यावर विद्यार्थ्याने विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तरले की, पेपर तपासणारा प्राध्यापक हादेखील माणूस आहे. त्याच्याकडूनही कधीकधी चूक होते, अशी सारवासारव केली. तसेच, रिचेकिंग हे वेळेत व्हावे, यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत असते. त्यांना उत्तरपत्रिका दाखवावी, ज्यात त्यांना काय चुकले आणि काय बरोबर हे कळेल. पालकांच्या भीतीने रिचेकिंगसाठी हजारोंच्या संख्येने अर्ज येतात.
रिचेकिंगनंतर ज्यांचे गुण वाढलेत, त्यांना रिचेकिंगच्या फीमध्ये सवलत देण्याचा विचार केला जाणार असल्याचेही तावडे म्हणाले. मुंबई विद्यापीठ रँकिंगमध्ये का येत नाही, अशा एका विद्यार्थिनीच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, दुर्दैवाने आपले विद्यापीठ रँकिंगचा फॉर्म नीट भरीत नाही.
डोनाल्ड ट्रम्पला निवडून यायला मोदींची गरज पडते
अमेरिकेला आपल्याबरोबर मैत्री करावीशी वाटते, असे वक्तव्य तावडे यांनी केले. याआधी असा कार्यक्रम झाला नव्हता. निवडणुकीच्या दृष्टीने ठिकठिकाणी आमदार, खासदार युवकांच्या भेटीला जात असून त्यांच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचे भाजपा युवा मोर्चातर्फे सांगण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाचे अधिकारी मात्र यावेळी दिसले नाहीत.