Republic Day 2021: ठाण्यात व्हिंटेज, सुपर कारचे आज संचलन; वाहतूक पोलिसांचा अनोखा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 11:42 PM2021-01-25T23:42:09+5:302021-01-25T23:43:40+5:30
रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांकडून ‘सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा’ हे अभियान सुरू आहे.
ठाणे : एकोणिसाव्या दशकातील कॅडिलॅक, बेंटली, फोर्ड, फरारी, शाही दिमाख मिरविणारी रोल्स रॉयस, डोळे दीपवणारी लम्बाेर्गिनी अशा एकापेक्षा एक व्हिंटेज आणि सुपर कार एकाच वेळी पाहण्याची सुवर्णसंधी ठाणेकरांना प्रजासत्ताक दिनी मिळणार आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे सुरू असलेल्या ‘रस्ता सुरक्षा जीवन रक्षा’ या मोहिमेअंतर्गत या ऐतिहासिक वाहनांचे संचलन ठाण्यात पार पडणार आहे.
रस्ते सुरक्षा मोहिमेंतर्गत ठाणे वाहतूक पोलिसांकडून ‘सडक सुरक्षा आणि जीवन रक्षा’ हे अभियान सुरू आहे. रस्त्यांवरील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लागावी, वाहनचालकांकडून नियमांचे पालन व्हावे, रस्ते अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी व्यापक जनजागृती केली जात आहे. या मोहिमेतील लोकसहभाग वाढावा या उद्देशाने वाहतूक पोलिसांनी खासगी कंपनीच्या माध्यमातून या वाहन रॅलीचे आयोजन केले आहे.
२६ जानेवारीला सकाळी ११ वाजता राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या संचलनाला सुरुवात होणार आहे. या रॅलीमध्ये ४० व्हिंटेज कार, ३० सुपर कार आणि मोटारसायकलस्वार सहभागी होणार आहेत. या वाहनांचे संचलन पाहणे ही ठाणेकरांसाठी पर्वणी ठरणार आहे. ठाणेकरांनी संचलन मार्गावरील रस्त्यांच्या कडेला उभे राहून या सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.