संचारबंदीचे उल्लंघन: ठाणे शहर पोलिसांनी केली साडे तीन हजार वाहने जप्त
By जितेंद्र कालेकर | Published: April 20, 2020 11:20 PM2020-04-20T23:20:47+5:302020-04-20T23:25:50+5:30
संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे कोरोनाच्या रुगांच्या संख्येत वाढ होत असतांना दुसरीकडे ठाणे शहर पोलिसांनीही विनाकारण फिरणा-यांवर कारवाईचा फास आवळण्यास जोरदार सुरुवात केली आहे. संचारबंदीच्या काळात ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये 19 एप्रिलपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाºया 779 जणांना अटक करण्यात आली. त्यांची तीन हजार 356 वाहने जप्त केली आहेत. अशा विनाकारण वाहन घेऊन फिरणा-यांकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
संचारबंदी लागू झाल्यापासून 25 मार्च ते 19 एप्रिल या कालावधीमध्ये ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाचही परिमंडळातील 35 पोलीस ठाण्यांमध्ये प्रत्येक परिमंडळाच्या स्तरावर विशेष पथके तैनात केली आहेत. ठाण्यातील राबोडी, मुंब्रा आणि कळवा तसेच भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरच्या काही भागांमध्ये राज्य राखीव दलाच्या तुकडयाही तैनात केल्या आहेत. ठाण्यात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संचारबंदीचे उल्लंघन करणाºयांची 550 वाहने जप्त केली. यामध्ये 298 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. यामध्ये रिक्षा, मोटारसायकल आणि कार आदी वाहनांचा समावेश आहे. भिवंडीमध्ये पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या विविध पथकांनी 228 वाहनांवर कारवाई करु न 10 गुन्हे दाखल केले. कल्याणमध्ये उपायुक्त व्ही. एम. पानसरे यांच्या विविध पथकांनी 390 वाहने जप्त करीत 245 जणांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई केली. उल्हासनगर परिमंडळामध्ये सर्वाधिक म्हणजे 641 वाहनांवर जप्तीची कारवाई उपायुक्त पी. पी. शेवाळे यांच्या पथकांनी केली. याठिकाणी १७ गुन्हे दाखल झाले आहेत. तर वागळे इस्टेट परिमंडळामध्ये पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली 516 वाहन चालकांवर कारवाई केली. याठिकाणी २०९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. संचारबंदीच्या काळात विनाकारण वाहने घेऊन फिरणाºयांची तीन हजार 356 वाहने जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत 779 जणांविरु द्ध कलम 188 तसेच मोटार वाहतूक कायद्यानुसार कारवाई केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
-------
वाहतूक पोलिसांनी केला 25 लाखाचा दंड वसूल
ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली 18 युनिटच्या वाहतूक पथकांनी विनाकारण फिरणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. वाहतूक शाखेनेही आतापर्यंत एक हजार 25 वाहने जप्त केली. त्यांच्याकडून 25 लाख 84 हजार 750 रु पयांचा दंड वसूल केला आहे. जप्त केलेली वाहने संचारबंदी शिथिल झाल्यानंतरच संबंधित चालकांना परत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.