संचारबंदीचे उल्लंघन: वागळे इस्टेट पोलिसांनी केली २० वाहन चालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 01:19 AM2020-05-11T01:19:37+5:302020-05-11T01:24:50+5:30
वागळे इस्टेट परिसरात ५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर पडवळनगर, शांतीनगर आदी भागात वागळे इस्टेट पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत २० चालकांवर कारवाई करीत वाहने जप्त केली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत बिनधास्त फिरणाºया २० वाहनचालकांवर गेल्या दोन दिवसांमध्ये वागळे इस्टेट पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्यावर साथ प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई केली असून ही वाहने जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
वागळे इस्टेट परिसरात ५० पेक्षा जास्त कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील पडवळनगर, शांतीनगर आदी भागात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी नाकाबंदी अधिक कडक केली आहे. अनेक भागात त्यांनी पोलीस पथकाच्या माध्यमातून जनजागृतीही केली आहे. ड्रोन कॅमेºयाच्या माध्यमातून दाटीवाटीतील वस्तीसह झोपडपट्टीच्या परिसरातही विनाकारण फिरणाºया नागरिकांसह वाहन चालकांवर करडी नजर ठेवली जात आहे. दरम्यान, ८ आणि ९ मे या दोनच दिवसांमध्ये वागळे इस्टेट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील २० वाहन चालकांवर कलम १८८ नुसार कारवाई केली असून ही वाहने जप्त केल्याचेही पठाण यांनी सांगितले.