साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन, १,२३१ जणांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:27 AM2021-07-01T04:27:17+5:302021-07-01T04:27:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत साथरोग प्रतिबंधक कायदा (कलम १८८) लागू आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार ...

Violation of Infectious Diseases Prevention Act, crimes against 1,231 people | साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन, १,२३१ जणांवर गुन्हे

साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन, १,२३१ जणांवर गुन्हे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी हद्दीत साथरोग प्रतिबंधक कायदा (कलम १८८) लागू आहे. या कायद्यातील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्यांविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. या कायद्याची अंमलबजावणी कल्याण परिमंडलचे ३ पोलीस आणि केडीएमसी यांच्यातर्फे सुरू आहे. मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाई आणि गुन्हे दाखल होऊनही सोशल डिस्टन्स न पाळणे, मास्क न वापरणे, जमाव बंदी आदेशाचे उल्लंघन करणे, कामाशिवाय फिरणे, लग्न सराईत उपस्थितांच्या घालून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन करणे, संचारबंदी नियमाकडे दुर्लक्ष करणे आदी प्रकार आजही सर्रास सुरू आहेत.

केडीएमसीच्या हद्दीत मंगळवारपर्यंत एकूण एक लाख ३६ हजार २१७ रुग्ण आढळले आहेत, तर एक लाख ३२ हजार ५६३ इतके रुग्ण बरे झाले आहेत. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कल्याण परिमंडल ३च्या हद्दीत साथरोग प्रतिबंधक कायदा लागू आहे. याअंतर्गत झालेल्या कारवाईत २२ मार्च २०२० ते ३१ मे २०२१ दरम्यान एक हजार २३१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यात कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी हद्दीत सर्वाधिक ३०८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५९, बाजारपेठ हद्दीत २२२, खडकपाडा १४८, रामनगर ११२, मानपाडा ४९, टिळकनगर ७२, तर विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ६१ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.

-----------------

काय आहे कलम १८८?

साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ अन्वये अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन तसेच निर्बंधांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी सध्या कलम १८८ लागू आहे. या कलमान्वये पाचपेक्षा अधिक लोकांना गर्दी करण्यास मनाई आहे. लॉकडाऊनसाठी घोषित केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास या कलमान्वये कारवाई होऊ शकते. विशेष म्हणजे कायदा मोडणाऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे जीवित वा वित्तहानी झालीच पाहिजे, असेही नाही. नियम मोडला की, संबंधीत व्यक्ती गुन्हा दाखल करण्यास पात्र ठरते.

-------------------------------------------

काय होऊ शकते शिक्षा?

कायद्यातील तरतुदीनुसार फक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस एक महिन्याचा कारावास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दुसऱ्या तरतुदीनुसार संबंधीत व्यक्तीने नियमाचे उल्लंघन केले आणि त्यातून एखाद्याच्या मानवी जीवन, स्वास्थ्य व सुरक्षिततेस धोका निर्माण झाला तर त्या व्यक्तीस सहा महिने कारावास किंवा एक हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तसेच हा गुन्हा जामीनपात्र आहे.

-------------------------------------------

नियमांचे काटेकोरपणे पालन महत्त्वाचे

कोरोना अजून संपलेला नाही. दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे. डेल्टा प्लसचा इतर ठिकाणी वाढता प्रादुर्भाव पाहता सरकारने पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. अशा वेळी सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे हाच उत्तम मार्ग आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे यात हलगर्जी मुळीच नको. जमावबंदी आदेशाचेही काटेकोरपणे पालन होणे महत्त्वाचे आहे.

- विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त, कल्याण परिमंडल ३

-----------------

गुन्हे दाखल - १,२३१

वाहने जप्त - निरंक

-----------------

फोटो आनंद मोरे

Web Title: Violation of Infectious Diseases Prevention Act, crimes against 1,231 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.