कल्याण डोंबिवलीत पशुगणनेमुळे प्लास्टिक बंदी आदेश धाब्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 07:43 PM2019-03-07T19:43:29+5:302019-03-07T19:47:04+5:30

महापालिकेकडून होतोय काणाडोळा; निवडणुकीच्या कामांमुळेही कारवाई होणार अशक्य

violation of plastic ban in kalyan dombivali | कल्याण डोंबिवलीत पशुगणनेमुळे प्लास्टिक बंदी आदेश धाब्यावर

कल्याण डोंबिवलीत पशुगणनेमुळे प्लास्टिक बंदी आदेश धाब्यावर

Next

- अनिकेत घमंडी

डोंबिवली: राज्यात प्लास्टिक बंदी लागू केलेली असतांनाच कल्याण डोंबिवलीमध्ये मात्र सर्रासपणे प्लास्टिक पिशव्या मिळत आहेत. भाजीबाजारात, फेरीवाल्यांकडे अन्यत्र छोट्या व्यावसायिकांकडे सर्रास बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत. ही बंदी लागू झाल्यानंतर सर्वत्र कारवाईचा सपाटा लावणा-या कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने पशूगणनेसह निवडणूक कामांमध्ये कर्मचारी व्यस्त असल्याचे कारण देत या कारवाईकडे परस्पर काणाडोळा केला आहे.

त्याचा फायदा घेत डोंबिवलीमध्ये फडके रोड, चिमणी गल्ली, रेल्वे स्थानक परिसर तसेच रामनगर, पश्चिमेला उमेशनगर, गुप्ते रोड या ठिकाणी तसेच कल्याणमध्येही पूर्व पश्चिम भागातील फेरीवाले, भाजी, फळ विक्रेते यांच्याकडे सर्रास प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत. या सर्व ठिकाणी प्लास्टिक बंदीची कडक कारवाई करण्यासाठी कर्मचारी वर्गाकडे वेळ नसल्याने या अतिरिक्त दिलेल्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे अधिका-यांनी स्पष्ट केले.

एकीकडे या महापालिकेत कच-याची समस्या गंभीर असतांनाच प्लास्टिक बंदीमुळे सुमारे ४० टन कचरा कमी झाल्याची स्पष्टोक्ती अधिका-यांनी दिली होती. त्यातच ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठीही स्वच्छता विभागाकडून प्रचंड प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी विविध ठिकाणच्या सोसायट्यांना वेगवेगळया रंगांचे डबे दिले जात आहेत. पण त्याचा प्रसारही थंडावला असल्याने ती समस्या देखिल जैसे थे आहे. अद्यापही बहुतांशी सोसायट्या सगळा कचरा एकत्रच देत असून महापालिकेच्या आरसी गाड्या, घंटागाड्यांमध्ये तो गोळा केला जात आहे. त्यात सर्रासपणे बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या आढळून येत असून महापालिकेने राज्य शासनाचे आदेश धाब्यावर बसवल्याची सर्वत्र चर्चा आहे.

सत्ताधारी शिवसेना भाजपालाही पर्यावरणाचा -हास होत असल्याबद्दल कोणतेही गांभिर्य नाही, त्यामुळेच एकीकडे या पक्षांचे नगरसेवक ओला सुका कचरा वर्गीकरणासाठी आग्रही असले तरीही परिसरात प्लास्टिक बंदीच्या पिशव्या मिळू नयेत, त्यावर कारवाई व्हावी यासाठी मात्र धडपड करतांना आढळून येत नसल्याची टिका पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

माझे सफाई निरीक्षक असे सुमारे ६० अधिकारी पशुगणनेच्या कामामध्ये व्यस्त आहेत. त्यातच आता निवडणूकांचीही कामे लागणार आहेत. पशुगणना व अन्य कामांमुळे प्लास्टिक बंदीवरील कारवाई कमी झाली असली तरी आता पुन्हा त्यावर जोर देण्यात येणार असून नक्की फरक जाणवेल - विलास जोशी, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, केडीएमसी 

शहरांमध्ये सर्रासपणे बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्या आढळून येत आहेत हे खर आहे. त्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याचे आदेश सफाई अधिकारी वर्गाला तातडीने दिले आहेत - विनिता राणे, महापौर, केडीमएसी

प्लास्टिक बंदी ही सोयीनुसार सुरू आहे. बंदीची कारवाई हा केवळ फार्स. त्या नावाखाली कोणाचे चांगभल होत आहे हे जाणण्याची खरी गरज आहे.पण त्यामुळे शहर बकाल होत आहेत याकडे मात्र सत्ताधा-यांचेही लक्ष नाही ही शोकांतिका आहे - प्रकाश भोईर, विरोधी पक्षनेते, केडीएमसी

Web Title: violation of plastic ban in kalyan dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.