लसीकरणावरून ठामपात शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:46 AM2021-08-18T04:46:48+5:302021-08-18T04:46:48+5:30

ठाणे : महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीने मंगळवारी पुन्हा महासभेत आंदोलन केले. ठाणे शहरामध्ये केवळ शिवसेनेच्या शाखांमध्येच लसीकरणाची ...

Violation of Shiv Sena-NCP due to immunization | लसीकरणावरून ठामपात शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी

लसीकरणावरून ठामपात शिवसेना-राष्ट्रवादीत बिघाडी

Next

ठाणे : महाविकास आघाडीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीने मंगळवारी पुन्हा महासभेत आंदोलन केले. ठाणे शहरामध्ये केवळ शिवसेनेच्या शाखांमध्येच लसीकरणाची शिबिरे आयोजित करण्यात येत असून, विरोधी पक्षातील नगरसेवकांनी मागणी केल्यानंतरही लसीकरण शिबिर राबविण्यात येत नाहीत. तसेच, अनेकदा महासभेमध्ये प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलल्यास आवाज म्युट केला जात असल्याचा आरोप करून विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मंगळवारी महासभेत आंदोलन केले, तर संतप्त झालेल्या महापौर नरेश म्हस्के यांनी महापालिकेत आमची एक हाती सत्ता आहे. पूर्ण बहुमत आहे, त्यामुळे अशी आंदोलन करायची असतील, आम्हाला तुमची गरज नसल्याचा दम भरला.

अर्थसंकल्पाची अंमलबजावणी होत नाही. तसेच, दूषित पाणीपुरवठाप्रकरणी स्टेमच्या अधिकाऱ्यांवरील कारवाई, स्मशानातील भ्रष्टाचार, लसीकरणातील दुजाभाव, नगरसेवकांची कामे यावर आयुक्तांकडून ठोस पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली तसेच प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांच्या उपस्थितीत २ ऑगस्ट रोजी महापालिकेत आंदोलन केले होते. त्यावेळी आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांच्या मागण्या मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न झाल्याने संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी ऑनलाइन महासभा सुरू असताना नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये घोषणा देऊन प्रवेश करून महासभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

लसीकरण हे ठामपाच्या अधिपत्याखाली होणे गरजेचे असताना शिवसेनेच्या शाखांमधून ते करण्यात येत आहे. तर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मागणी करूनही ते राबविण्यात येत नाही. स्थायी समितीच बेकायदेशीर आहे, अर्थसंकल्पाची अंमलबजावणी करावी, लसीकरण मोहीम अधिक वेगाने राबवावी, या मागण्यांसाठी राष्ट्रवादीने हे आंदोलन केले.

विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी, ठाणे शहरात सध्या प्रशासनाची मनमानी सुरू आहे. अशा स्थितीमध्ये नगरसेवकांची कामे रखडविलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले जात आहे. दुसरीकडे सत्ताधारी नगरसेवकांच्या प्रभागातच लसीकरण मोहीम राबविली जात आहे. सबंध शहरात पूरस्थिती आलेली असताना कळवा, मुंब्रा आणि दिवा भागातील पंचनामे केलेले नाहीत. स्टेममधून होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्याबाबतचे पुरावे सादर करूनही कारवाई केलेली नाही. स्मशान आणि दफनभूमीमध्ये ठेकेदारांकडून भ्रष्टाचार सुरू असून, त्याचेही पुरावे सादर केलेले आहेत. मात्र, आयुक्तांकडून कारवाई होत नाही. त्यामुळेच हे आंदोलन केल्याचे सांगितले. तर, प्रदेश चिटणीस तथा ज्येष्ठ नगरसेवक सुहास देसाई यांनी सत्ताधाऱ्यांवर तसेच प्रशासनावर टीका करून सध्या गठित केलेली महासभाच बेकायदेशीर असून, स्थायी समितीची तत्काळ निवडणूक घ्यावी, नगरसेवकांना तत्काळ निधी द्यावा, लसीकरण सर्वच ठिकाणी करावे, या मागण्यांसाठी आम्ही हे आंदोलन केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

महापौर म्हणतात, राष्ट्रवादीची गरज नाही

राष्ट्रवादीकडून सुरू असलेल्या या आंदोलनाच्या विरोधात महापौर संतप्त झाले. त्यांनी महापालिकेत आमची एकहाती सत्ता आहे, आम्हाला स्पष्ट बहुमत आहे, त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलन करायची असतील तर आम्हाला तुमची गरज नसल्याचे खडेबोल सुनावले.

Web Title: Violation of Shiv Sena-NCP due to immunization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.