डॉक्टरकडून रुग्णालयातच तरुणीवर अत्याचार; आरोपी फरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 05:04 IST2019-12-14T04:50:12+5:302019-12-14T05:04:33+5:30
ज्युपीटर रुग्णालयाने ओपीडी केबिनमध्ये अत्याचार होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे.

डॉक्टरकडून रुग्णालयातच तरुणीवर अत्याचार; आरोपी फरार
ठाणे : ठाणे येथील ज्युपीटर रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या २७ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर रुग्णालयात आणि इतर ठिकाणी डॉक्टरने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी फरार योगेश गोडगे या डॉक्टराविरोधात पीडितेच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
योगेशने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच स्वत:चे लग्न झालेले असतानादेखील पीडितेशी लग्नाचे नाटक करून तिच्यावर त्याने रुग्णालय व इतर ठिकाणी अत्याचार केला. मात्र, फसवणूक झाल्याचे समजताच पीडित तरुणीने वर्तकनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन योगेश याच्याविरोधात तक्रार दिली. त्यानुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून फरार डॉक्टरचा शोध सुरू असल्याची माहिती वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. बी. गायकवाड यांनी दिली.
तर ज्युपीटर रुग्णालयाने ओपीडी केबिनमध्ये अत्याचार होणे अशक्य असल्याचे म्हटले आहे. डॉक्टरांचे ओपीडी केबिनचे दरवाजे आतून लॉक होत नाहीत. तसेच कुठलीही केबिन साऊंडप्रुफ नसल्याने कोणत्याही प्रकारचा मोठा आवाज किंवा प्रतिकार बाहेर ऐकू येतो. रुग्णालय अशा घटनांचा निषेध करीत असून पोलीस आणि न्यायव्यवस्थेला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे रुग्णालयाच्या जनसंपर्कप्रमुख जान्हवी बेल्लारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.