वाडा येथे श्रमजीवीचा विराट मोर्चा
By admin | Published: December 22, 2015 12:14 AM2015-12-22T00:14:21+5:302015-12-22T00:14:21+5:30
महागाई, कुपोषण व ‘त्या’ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज वाडा तहसिलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले.
वाडा : महागाई, कुपोषण व ‘त्या’ आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज वाडा तहसिलदार कार्यालयावर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधले.
या मोचार्चे नेतृत्व श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर, सहसरचिटणीस विजय जाधव यांनी केले.
कहा गये अच्छे दिन ; वापस लाओ पुराने दिन, मंत्री खातो तुपाशी ; आदिवासी मुलं उपाशी, पोषण आहार मिळालाच पाहिजे ; मिळालाच पाहिजे, भाजपच्या गुंडांना अटक करा; अटक करा, सवरा मंत्री कोणाचा ; दलालांचा ठेकेदारांचा, खाली करा खाली करा; सवरा खुर्ची खाली करा अशा घोषणा मोर्चा दरम्यान देण्यात आल्या.
देसई नाका येथून रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत फिरून तिचे रुपांतर तहसिलदार कार्यालयासमोर मोर्चात झाले. यावेळी मोर्चात कांदा, लसूण व सकस आहार योजने अंतर्गत भरलेले जेवणाचे ताट प्रतिकात्मक स्वरूपात तहसिलदारांना देण्यात आले. २५ रूपयांत सकस आहार देणे शक्य नसताना अशी फसवी योजना कार्यान्वित करणाऱ्या सरकारचा यावेळी निषेध केला. वाढत्या महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा, ४ डिसेंबर २०१५ रोजी उद्घाटन केलेली अमृत आहार योजना प्रत्यक्षात कार्यान्वित झालेली नसून आजपर्यंत एकाही तालुक्यात निधी उपलब्ध झाला नसून योजना फक्त कागदावर आहे. या योजनेमुळे आधीच कुपोषित म्हणून जन्मलेल्या मुलांचे कुपोषण कसे दूर होणार याबाबत स्पष्टीकरण द्यावे. व्ही. सी. डी. सी. बंद करून सरकारने त्याला पर्यायी योजना दिलेली नाही. आणि अमृत आहार योजना हा त्याचा पर्याय नाही म्हणूनच कुपोषित मुलांच्या विशेष आहारासाठी व्ही. सी. डी सी. योजना पुन्हा सुरू करावी या मागण्या होत्या. या मोचार्ला श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी बाळाराम भोईर, केशव नानकर, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, सरिता जाधव, लक्ष्मण पडवले, जया पारधी, दशरथ बालके, भगवान मते, आदींनी भाषणात सवरा यांच्या वर टीका केली.