व्हायरल ‘ताप’ ठरतोय डोकेदुखी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:27 AM2021-07-15T04:27:37+5:302021-07-15T04:27:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : बदलत्या हवामानामुळे कल्याण-डोंबिवली शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचे सावट ...

Viral fever is a headache! | व्हायरल ‘ताप’ ठरतोय डोकेदुखी!

व्हायरल ‘ताप’ ठरतोय डोकेदुखी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कल्याण : बदलत्या हवामानामुळे कल्याण-डोंबिवली शहरात ताप, सर्दी, खोकला या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. कोरोनाचे सावट कायम असताना व्हायरल ताप डोकेदुखी ठरत असून जून, जुलैचा आढावा घेता, ४१ दिवसांत चार हजार ५०४ रुग्ण आढळून आले आहेत. व्हायरल ताप वाढला असताना, तिघांना डेंग्यूची आणि सातजणांना मलेरियाची लागण झाली आहे.

जूनमध्ये मान्सूनला सुरुवात झाली की, डेंग्यू, मलेरिया, टायफॉइड, लेप्टो स्पायरोसिस, स्वाईन फ्लू, चिकुनगुन्या आदी आजारांची लागण होत असल्याचे मनपा हद्दीतील दाटवस्त्यांसह अन्य ठिकाणच्या लोकवस्तीत दिसून येते. यंदाही पावसाळ्यातील या साथीच्या आजारांनी डोके वर काढले असून, व्हायरल ताप, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, अतिसार, हगवण (डायरिया), कावीळ, टायफॉइडचे रुग्ण आढळले आहेत.

जूनच्या सुरुवातीला दमदार पाऊस पडला; मात्र त्यानंतर गेल्या आठवड्यापासून ऊन-पावसाच्या खेळामुळे वातावरणात झालेल्या बदलांमुळे तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जूनमध्ये व्हायरल तापाचे तीन हजार ६७२ रुग्ण, तर ११ जुलैपर्यंत ८३२ रुग्ण आढळले आहेत. एकत्रित आढावा घेता, ४१ दिवसांत चार हजार ५०४ व्हायरल तापाचे रुग्ण आढळले आहेत, तर, गॅस्ट्रोचे ७, अतिसारचे २७, हगवण १३, कावीळ २२, टायफॉईडचे १४, डेंग्यू ३, मलेरियाचे सात रुग्ण आढळले आहेत. तापाबरोबरच सर्दी-खोकल्याचे रुग्णही वाढले आहेत. सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यात व्हायरल तापाचे रुग्ण वाढत असल्याने कल्याण-डोंबिवलीकरांच्या चिंतेत भर पडली आहे.

------------------------

‘ताप अंगावर काढू नका’

बदलत्या हवामानात तापाचे, सर्दी, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. सध्या तापाचे रुग्ण वाढले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यात कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे अंगावर ताप काढू नका. या साथरोगाच्या वातावरणात जर ताप, सर्दी, खोकला असला तरी कोरोना चाचणी करणे महत्त्वाचे आहे. कोरोना नसल्याचे निदान झाल्यास त्याप्रमाणे पुढील उपचार घेऊ शकतात.

- डॉ. प्रतिभा पानपाटील, साथरोग प्रतिबंधक विभाग अधिकारी, केडीएमसी

-----------------------------------

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के

सध्या दररोज ७२ ते ११० च्या आसपास कोरोना रुग्ण आढळत आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२४ टक्के इतके असून, मृत्यूदर १.९७ टक्के इतका आहे. दररोज साडेतीन ते चार हजार कोरोना चाचण्या होत आहेत. ३२ केंद्रांवर कोरोना चाचणी सुरू असून, सध्या मनपाचे डोंबिवलीतील हभप कै. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल, जिमखाना आणि कल्याणमधील आर्ट गॅलरी ही तीनच कोरोना उपचार केंद्र सुरू आहेत, अशी माहिती डॉ. पानपाटील यांनी दिली.

------------------------

Web Title: Viral fever is a headache!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.