नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत मिळवून देण्याची विशाल कोळी यांची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 06:03 PM2020-12-25T18:03:51+5:302020-12-25T18:04:00+5:30
दरम्यान मागील दोन वर्षे सातत्याने मच्छिमारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. मत्स्य व्यवसायासाठी तसेच नौका बांधणीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा पेचप्रसंग मच्छिमार बांधवांसमोर उभा ठाकलेला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई :-
किनारपट्टीवर धडकलेले मे- जून 2020 मधील निसर्ग चक्रीवादळ तर मार्च -एप्रिल मध्ये आलेले कोरोना विषाणूचे संकट यांमुळे आधीच मत्स्योद्योगाचे अर्थकारण कोसळल आहे.
एकूणच नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांना मदत मिळवून देण्यासाठी सरकारने लक्ष देऊन हातभार लावला पाहिजे या मागणीसाठी अर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विशाल कोळी यांनी राज्याच्या मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे लेखी पत्र देत मागणी केली आहे.
दरम्यान मागील दोन वर्षे सातत्याने मच्छिमारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे.
मत्स्य व्यवसायासाठी तसेच नौका बांधणीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा पेचप्रसंग मच्छिमार बांधवांसमोर उभा ठाकलेला आहे.
त्याचप्रमाणे टाळेबंदीमुळे मासळीच्या निर्यातीवर असलेले निर्बंध, मासेमारी हंगाम उशिराने सुरू करण्याची होत असलेली मागणी आणि मासळी बाजार सुरू करण्याबाबत असलेली अनिश्चितता अशा एक ना अनेक कारणांमुळे मच्छिमार समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा काळात आर्थिकदृष्ट्या कोलमडून पडलेल्या मच्छीमार बांधवांना मदत मिळण्याकामी अर्नाळा ग्रामपंचायत समितीचे माजी सदस्य विशाल दामोदर कोळी यांनी मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
अशाही परिस्थितीत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वसईच्या विविध भाागातील समुद्र किनार्यांवर सुकविण्यासाठी ठेवलेल्या मासळीचे अतोनात नुकसन झाले आहे.
यामध्ये प्रामुख्याने बोंबील, करंदी, मांदेळी आणि जवळा ही सर्व मासळी पावसात भिजून गेली असल्याने ती खराब होऊन मच्छिमारांवर ती टाकून देण्याची वेळ आली आहे.
परिणामी सुक्या मासळीच्या प्रक्रियेत संपूर्ण कुटुंब कामात गुंतलेले असते. तसेच मासळी सुकविण्याच्या कामात मोठे श्रमही घ्यावे लागतात. परिणामत: वारंवार होत असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मच्छिमार लोकांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे आणि म्हणूनच पुढे व्यवसाय कसा करावा हा प्रश्न समोर उभा आहे.
मच्छिमार समाजाची झालेली ही दयनीय अवस्था लक्षात घेता, राज्य शासनाने तातडीने मदत प्रत्यक्षात मच्छीमारापर्यंत पोहचविणे अत्यावश्यक आहे.
त्यामुळे या समाजाला भरीव आर्थिक मदत आणि इतर बाबतीत सवलत देण्याची विनंती अर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विशाल दामोदर कोळी यांनी मत्स्यव्यवसाय, वस्त्रोद्योग, बंदरे विकासमंत्री अस्लम शेख यांच्याकडे केली आहे.